संभाजी पुलावरील मेट्रो मार्गाचे काम बंद पडल्याने महामेट्रोला प्रतिदिन ५ कोटी रुपयांचा फटका !

पुणे – संभाजी पुलावरील मेट्रो मार्गाचे काम गेल्या ३ मासांपासून बंद असल्याने महामेट्रोला प्रतिदिन ५ कोटी ४० लाख रुपयांचा फटका बसत आहे. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील मेट्रो प्रकल्पासाठी अनुमाने ११ सहस्र कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून या प्रकल्पासाठी ५ सहस्र ८०० कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. प्रकल्पाला विलंब झाल्यास कर्जाचे व्याज आणि हप्ते वाढल्याने महामेट्रोचा खर्च वाढणार आहे. संभाजी पुलावरील मेट्रो भूमीपासून २१ फुटांवर आहे. त्याची उंची ३० फुटांवर वाढवावी, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांनी केली आहे.

गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, महामेट्रोचे अधिकारी यांच्यासमवेत बैठका झाल्या असून अल्पावधीतच सामोपचाराने संभाजी पुलावरील मेट्रोच्या उंचीसंदर्भात निर्णय घेऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात येईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.