सातारा जिल्‍ह्यात अवकाळी पावसाने कोट्यवधी रुपयांची हानी !

३५ ते ४० मेंढ्यांचा थंडीमुळे मृत्‍यू

सातारा, ३ डिसेंबर (वार्ता.) – जिल्‍ह्यात २ आणि ३ डिसेंबर या दिवशी झालेल्‍या मुसळधार अवकाळी पावसामुळे कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे. अवकाळी पावसामुळे वाई आणि खटाव तालुक्‍यात ३५ ते ४० मेंढ्यांचा थंडीमुळे मृत्‍यू झाला असून १० मेंढ्या अत्‍यवस्‍थ आहेत. विविध तालुक्‍यांत शेतात पाणी शिरले आहे. त्‍यामुळे गहू, ज्‍वारी, हरभरा आदी पिकांची मोठी हानी झाली आहे. महाबळेश्‍वर तालुक्‍यातील भिलार, पाचगणी, सायगाव येथे स्‍ट्रॉबेरी पिकांची मोठी हानी झाली आहे, तसेच पर्यटनावरही परिणाम झाला आहे. वाई-महाबळेश्‍वर रस्‍त्‍यावर परसणी घाटात दरड कोसळली असून काही काळ वाहतूक विस्‍कळीत झाली होती. बांधकाम विभागाच्‍या वतीने दरड हटवण्‍याचे कार्य चालू आहे. सातारा तालुक्‍यातील जिहे-कठापूर येथील कृष्‍णा नदीवरील पूल पाण्‍याखाली गेला असून पूलावरील वाहतूक थांबवण्‍यात आली आहे. अवकाळी पावसामुळे जिल्‍ह्यात कोट्यवधी रुपयांची हानी झाली असून संबंधितांनी हानीभरपाईची मागणी केली आहे.