‘ट्विटर’वर व्यक्तीच्या संमतीविना तिची छायाचित्रे आणि व्हिडिओ ‘शेअर’ करता येणार नाहीत ! – ‘ट्विटर’चे नवे धोरण

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – ‘ट्विटर’ आस्थापनाने त्याच्या धोरणात महत्त्वपूर्ण पालट केला आहे. त्यानुसार आता कोणत्याही व्यक्तीच्या संमतीविना तिची छायाचित्रे किंवा व्हिडिओ ‘शेअर’ करता येणार नाहीत. आतापर्यंत वापरकर्ते दुसर्‍या वापरकर्त्याचे छायाचित्र आणि व्हिडिओ त्याच्या अनुमतीविनाच ‘शेअर’ करू शकत होता. नव्या नियमाचा मुख्य उद्देश छळविरोधी धोरण अधिक सशक्त करणे आणि महिला वापरकर्त्यांना सुरक्षा देणे, हा असल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले आहे. ट्विटरचा हा नियम सर्वसामान्य नागरिकांसाठी असून नामांकित व्यक्तींसाठी नसेल.

१. ट्विटरने सांगितले की, खासगी छायाचित्रे आणि व्हिडिओ ‘शेअर’ केल्याने एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेचे उल्लंघन होऊ शकते. त्यामुळे भावनिक आणि शारीरिक हानीदेखील होऊ शकते. या गोष्टींचा अपवापर केल्याने खासगी आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः महिला आणि अल्पसंख्यांक समुदायाच्या सदस्यांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

२. ट्विटरने यापूर्वीच त्याच्या वापरकर्त्यांना इतरांची वैयक्तिक माहिती, ओळख दर्शवणारी कागदपत्रे, आर्थिक माहिती आणि वैद्यकीय माहिती ‘शेअर’ करण्यापासून प्रतिबंधित केले आहे.