|
पणजी, १ डिसेंबर (वार्ता.) गोवा फॉरवर्डचे आमदार जयेश साळगावकर यांना पक्षाकडून पक्षविरोधी कारवाया केल्यावरून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी जयेश साळगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे विधान केले होते. या विधानावर जयेश साळगावकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, तसेच ते आम्हाला टाळत आहेत, असे पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. जयेश साळगावकर यांना नोटिसीला उत्तर देण्यासाठी २४ घंट्यांची मुदत देण्यात आली असून त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सरदेसाई पुढे म्हणाले. विजय सरदेसाई काँग्रेससमवेत युती करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना भेटायला गेले होते. त्या वेळी शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर त्यांच्यासमवेत होते; पण जयेश साळगावकर नव्हते.
जयेश साळगावकर आमदारकीचे त्यागपत्र देण्याच्या सिद्धतेत
ताज्या वृत्तानुसार जयेश साळगावकर सायंकाळी उशिरा सभापतींची भेट घेऊन आमदारकीचे त्यागपत्र देणार असून गोवा फॉरवर्ड पक्षही सोडणार आहेत.