एका मंत्र्याचा ‘सेक्स स्कँडल’मध्ये सहभाग असल्याचा काँग्रेसने आरोप केल्यानंतर भाजपची गाभा समितीची बैठक वादळी

पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी मंत्र्याला मंत्रीमंडळातून त्वरित काढून टाकण्याची समितीतील काही सदस्यांची मागणी

पणजी, १ डिसेंबर (वार्ता.) – गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे गिरीश चोडणकर यांनी शासनातील एक मंत्री पदाचा गैरवापर करून एका महिलेचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप करून संबंधित मंत्र्याला १५ दिवसांत मंत्रीमंडळातून काढून टाकावे अन्यथा आंदोलन करण्याची चेतावणी ३० नोव्हेंबर या दिवशी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली होती. या पार्श्‍वभूमीवर १ डिसेंबर या दिवशी भाजपच्या गाभा समितीची झालेली बैठक वादळी ठरली.

विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने भाजपची प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी संबंधित मंत्र्याला मंत्रीमंडळातून त्वरित काढून टाकावे, अशी मागणी पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो आणि अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी बैठकीत केली. बैठकीत इतर काही सदस्यांनीही या विषयावरून चिंता व्यक्त केली.