नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या सुरक्षेत अनेक त्रुटी !

भंडारदरा धरण

नगर – येथील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या भिंतीवर नागरिक आणि वाहन यांचा वावर, धरणाच्या सुरक्षेत असलेले अपुरे पोलीस बळ याविषयी गुप्तचर यंत्रणेने अप्रसन्नता व्यक्त करत या त्रुटी दूर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला केल्या आहेत. धरणाच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेला पोलीस बंदोबस्त वाढवण्याचीही सूचना केली आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाने यापुढे धरणाच्या भिंतीवर कुणालाही न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (अशा सूचना गुप्तचर यंत्रणेला का द्याव्या लागतात ? जलसंपदा विभाग स्वतः यामध्ये लक्ष का घालत नाही ? मोठी दुर्घटना घडल्यावरच जलसंपदाविभाग जागा होणार का ? – संपादक)

धरणांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यासंबंधी सूचना देण्याचे काम गुप्तचर विभागाकडून करण्यात येत असते. त्यानुसार केंद्रीय आणि राज्य गुप्तचर विभागांच्या अधिकार्‍यांच्या संयुक्त पथकाने भंडारदरा धरणाला भेट देऊन पहाणी केली. यामध्ये केंद्रीय गुप्तवार्ता, राज्य गुप्तवार्ता, जिल्हा विशेष शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस यांचा समावेश होता.