प्रकल्पबाधित शेतकर्यांची चेतावणी
राहुरी (जिल्हा नाशिक) – सुरत-हैदराबाद एक्सप्रेस ग्रीनफिल्ड महामार्गासाठी भूसंपादन करतांना भूमींचे स्थानिक बाजार मूल्य विचारात घेऊन मोबदला द्यावा, त्यानंतरच भूसंपादनाची कार्यवाही करावी. तसे न झाल्यास राहुरी येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याची चेतावणी तालुक्यातील प्रकल्पबाधित १९ गावांमधील शेतकर्यांनी दिली आहे. सुरत-हैदराबाद महामार्गासाठी नगर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या बागायती आणि फळझाडे असणारे क्षेत्र संपादित करण्यासंदर्भात अधिसूचना काढली आहे. शेतकर्यांना विश्वासात न घेता हुकूमशाही पद्धतीने कार्यवाही होत आहे. राजपत्रात बागायती भूमीच्या नोंदी जिरायती क्षेत्र म्हणून केल्या आहेत. त्या चुकीच्या नोंदींची दुरुस्ती व्हावी, स्थानिक बाजार मूल्य विचारात घेऊन मोबदला द्यावा, शेतकर्यांच्या मालकीच्या भूमीच्या सातबारा उतार्यावर केलेली महामार्गाची नोंद रद्द करावी इत्यादी मागण्या निवेदनात केल्या आहेत.