राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी धर्माची पूजा म्हणजेच समष्टी साधनेत सहभागी व्हा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पुणे आणि सांगली येथील धर्मप्रेमी अन् जिज्ञासू यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा पार पडला !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

पुणे – प्रत्येक युगात भगवंताने भक्त, साधू आणि संत यांना आपल्या समवेत घेऊन अधर्माचा नाश केला अन् धर्माची पुनर्स्थापना केली. आजच्या युगातही अधर्म माजला आहे. या अधर्माचा शेवट वर्ष २०२३ मध्ये होणार असून संपूर्ण जगात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. या धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी समष्टी सेवा करणे क्रमप्राप्त आहे. समष्टी सेवा म्हणजे धर्माची पूजा आहे. राष्ट्र-धर्म संकटात असतांना त्यांच्या रक्षणासाठी समष्टी साधनेत सहभागी होऊया, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. पुणे आणि सांगली येथील धर्मप्रेमी अन् जिज्ञासू यांच्यासाठी ऑनलाईन सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्या मार्गदर्शन करत होत्या. या सोहळ्यात १८५ हून अधिक जिज्ञासू आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन सनातन संस्थेच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. रश्मी नाईक यांनी केले. सांगली येथील सौ. पौर्णिमा गडकरी यांनी सोहळ्याचा उद्देश सांगितला.

क्षणचित्रे

१. सत्संग सोहळ्यात उपस्थित जिज्ञासू केवळ ४ – ५ मास सत्संगाला जोडले असूनही ‘त्यांच्यामध्ये श्रद्धा आणि भाव निर्माण झाला होता’, असे त्यांच्या अनुभूती ऐकतांना जाणवले.

२. सत्संगात सांगितल्यानुसार कृती करत असल्यामुळे जिज्ञासूंनी अनुभवकथन आणि प्रयत्न तत्परतेने लिहून दिले अन् ते सत्संग सोहळ्यात मांडण्यासही सिद्ध झाले. जिज्ञासूंनी भावपूर्णपणे आणि सहजतेने अनुभवकथन केले. त्यात सनातन संस्था, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सत्संग घेणारे साधक यांच्याप्रती त्यांचा कृतज्ञताभाव जाणवत होता.

३. धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी त्यांच्या मनोगतामध्ये ‘सत्संगाचा पुष्कळ लाभ होत असून धर्माचरण केल्यानेही लाभ होत आहे. सत्संग सोहळ्यात इतरांचे अनुभव, अनुभूती आणि प्रयत्न यांतून पुष्कळ शिकायला मिळाले’, असे सांगितले.

सत्संग सोहळ्यात काही जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत

१. श्री. बाबूराव निकम, सांगली – सत्संग सोहळ्यामध्ये मिळालेल्या मार्गदर्शनातून हिंदु धर्मावर होत असलेल्या आघातांविषयी माहिती मिळाली. त्यामुळे हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी कार्य करण्याची प्रेरणाही मिळाली.

२. सौ. तृप्ती पाटील, पुणे – देवाचे अधिष्ठान ठेवल्यानेच सर्व गोष्टी आनंददायी होतात, हे लक्षात आले. सेवेतूनही आनंद मिळायला लागल्याने सेवा वाढण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. सत्संगात स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया शिकवल्याने घरी चुका लिहिण्याचा भाग वाढवला. त्यामुळे
घडणार्‍या प्रसंगांमध्ये स्वभावदोषांवर मात करण्यासाठी पुष्कळ साहाय्य झाले.

३. सौ. लता घोडके, मिरज – सत्संग सोहळा ऐकल्यानंतर ‘प्रत्यक्ष गुरुमाऊलीच हे मार्गदर्शन करत आहे’, असे वाटले. ‘माझे साधनेतील प्रयत्न अल्प पडत असूनही गुरुमाऊली आनंदच देत आहे, पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करत आहे, पुढे येणार्‍या संकटांतूनही तारून नेऊन रक्षण करत आहे’, असा दृढ विश्वास मनात निर्माण झाला. सत्संगामुळे साधनेतील प्रयत्नांना गती मिळाली. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया शिकायला मिळाली आणि आनंदही मिळाला. अनेक प्रसंगांमध्ये शांत रहाण्याचीही बुद्धी या सत्संगामुळे मिळत आहे.

सत्संग सोहळ्यात सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

सौ. सुनिता गायधनकर, पुणे – ‘ऑनलाईन’ सत्संगाला उपस्थित रहाण्यासाठी, तसेच नामजप करण्यासाठी पूर्वी अनेक अडचणी येत होत्या; पण सत्संग नियमित चालू झाल्यानंतर सत्संगसेवकांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळे माझ्या प्रयत्नांमध्ये वाढ झाली. दिवाळीच्या आधी माझ्या मुलीला डेंग्यूची लागण झाल्याने तिला रुग्णालयात अतीदक्षता विभागात ठेवावे लागले. आधुनिक वैद्यांनी सांगितले की, तुमच्या मुलीच्या रक्तातील पेशी अल्प झाल्याने तिला रक्त द्यावे लागेल. त्यानंतर सत्संगसेविका सौ. अर्चना घनवट यांचा मला भ्रमणभाष आला. त्या वेळी त्यांनी मला ‘देवाचा धावा कसा करायचा ? कोणत्या प्रार्थना करायच्या ?’, याविषयी सांगितले. त्याप्रमाणे केले. दुसर्‍या दिवशी आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘मुलीला रक्त देण्याची आवश्यकता नाही. दोनच दिवसांत तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता.’’

(ही अनुभूती सांगतांना सौ. सुनीता गायधनकर यांचा भाव जागृत होत होता.)

‘मी काहीच करत नाही’, हेच आपल्याला साध्य करायचे आहे !- सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सत्संग सोहळ्यातील अनुभवकथनाच्या सत्रानंतर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘अनुभूती ऐकतांना चांगले वाटत होते. ‘सर्वांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटत होते. साधना केल्यानंतर होणार्‍या पालटांमुळे सत्संग सोहळ्यातील वातावरणही चैतन्यदायी झाले. देव इतका दयाळू आहे की, तो कुणाचाही हात सोडत नाही. देव केवळ भावाचा भुकेला असतो. भगवंतावरील श्रद्धा वाढली की, अडचणी अल्प होऊन साधनेत पुढे जाण्यासाठी साहाय्य होते. केवळ विचारांच्या स्तरावर नव्हे, तर अध्यात्मात कृतीला महत्त्व आहे. मी काहीच करत नाही, हेच आपल्याला साध्य करायचे असते. हा कृतज्ञताभाव साधनेमुळेच निर्माण होतो.’’

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक