६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मनीषा अरविंद गाडगीळ यांचा आज कार्तिक कृष्ण पक्ष द्वादशी (१ डिसेंबर २०२१) या दिवशी ६० वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सौ. कविता पवार यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
श्रीमती मनीषा अरविंद गाडगीळ यांना ६० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून नमस्कार !
१. यजमानांची स्थिती मरणासन्न असूनही सौ. मनीषा गाडगीळ अत्यंत स्थिर आणि आनंदी असणे, यजमानांचे निधन झाल्यास अडचण येऊ नये’, यासाठी बहिणीशी बोलून तिच्या जेवणाचे नियोजन करणे अन् ‘हे सर्व केवळ साधनेमुळेच होऊ शकते’, याची जाणीव होणे
‘मी सौ. मनीषा गाडगीळ यांच्या घरी घरकाम करत असून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करते. १२.३.२०२० या दिवशी सौ. मनीषा गाडगीळ यांचे यजमान श्री. अरविंद गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) पुष्कळ आजारी होते. सकाळपासून ताप आल्याने ते अगदी मरणासन्न अवस्थेतच होते. त्या वेळी सौ. गाडगीळकाकू अतिशय स्थिर राहून घरातील सर्व कामे करत होत्या. त्या वेळी त्यांनी त्यांच्या बहिणीला सांगितले, ‘‘यजमानांचे निधन कधीही होऊ शकते. त्या दृष्टीने तुझ्या जेवणाचे नियोजन करूया.’’ त्यांची बहीण संकुलातच रहात असल्याने ती त्यांच्याच घरी महाप्रसादासाठी जाते. त्या सर्व नियोजन इतक्या स्थिरतेने करत होत्या की, ते पाहून मला पुष्कळ आश्चर्य वाटले. ‘हे केवळ साधनेमुळेच शक्य होऊ शकते’, याची मला जाणीव झाली. यजमानांची अशी अवस्था असतांनाही त्यांच्या तोंडवळ्यावर कसलाही ताण नव्हता. त्यांच्या घरातील सर्वजण त्या वेळी आपापल्या सेवेसाठी गेले होते, तरीही त्या आतून आनंदी असल्याचे मला जाणवले.
२. यजमानांची प्रकृती ठीक नसतांनाही त्यांनी साधिकेच्या मुलाचा वाढदिवस आठवणीने साजरा करणे आणि घरात कठीण प्रसंग असतांनाही काकूंनी इतक्या सहजतेने वाढदिवस साजरा केल्याने त्यांच्यातील ‘इतरांचा विचार करणे’ हा गुण लक्षात येणे
दुसर्या दिवशी म्हणजे १३.३.२०२० या दिवशीही श्री. गाडगीळ यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा नव्हती. अधूनमधून काही क्षणच ते डोळे उघडत होते. त्या दिवशी माझा मुलगा कु. आदित्य पवार याचा तिथीने वाढदिवस होता. प्रत्येक वर्षी काकू त्याला काहीतरी भेटवस्तू देऊन त्याचे कौतुक करतात. या वर्षीही त्यांनी मुलाला बोलावले होते; परंतु ‘काकांची प्रकृती ठीक नाही, तर त्याला कसे पाठवायचे ?’, असा विचार माझ्या मनात आल्याने मी त्याला पाठवले नाही. रात्री ८ वाजता सौ. गाडगीळकाकूंचा भ्रमणभाष आला. त्यांनी माझ्या मुलाला पुन्हा बोलावले आणि मला सांगितले, ‘‘त्याला या दिवसाचा आनंद मिळायला हवा; म्हणून पाठव.’’ त्यानंतर मी त्याला जाण्याची अनुमती दिली. त्या वेळीसुद्धा मला वाटले, ‘इतका कठीण प्रसंग घरात असूनसुद्धा काकू माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा करायला विसरल्या नाहीत. ‘त्या इतरांचा विचार किती करतात !’, हे त्या वेळी माझ्या लक्षात आले. ‘त्यासाठी सतत देवाच्या अनुसंधानात राहून प्रयत्न करायला हवेत’, असा विचार माझ्या मनात आला.
‘कठीण प्रसंगातही स्थिर रहाणे आणि इतरांचा विचार करणे’, हे गुण सौ. गाडगीळकाकू यांच्या माध्यमातून मला शिकायला मिळाले.
३. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘माझ्या साधनेतही वाढ होऊ दे आणि वरीलप्रमाणे गुण माझ्यात येण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ दे’, ही देवाच्या चरणी प्रार्थना ! ‘हे सर्व प्रसंग समोर घडवून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्या माध्यमातून मला शिकवले’, यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता !’
– सौ. कविता पवार, पनवेल (१७.३.२०२०)
१३.७.२०२० च्या रात्री अरविंद गाडगीळ यांचे निधन झाले. येथे सौ. कविता पवार यांनी केलेले लिखाण हे अरविंद गाडगीळ यांच्या निधनापूर्वीचे असल्याने ते आहे तसेच प्रसिद्ध करत आहोत. |