चि. अक्षय पाटील यांची कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
श्री. अजय पाटील आणि सौ. संगीता अजय पाटील (वडील अन् आई), कोल्हापूर
१. काटकसर
‘अक्षयला बससाठी किंवा पेट्रोल भरण्यासाठी पैसे दिल्यावर त्यांमधील काही पैसे शिल्लक रहायचे. ते तो साठवून ठेवत असे. त्याने कधीही अनावश्यक व्यय केला नाही.’
२. प्रेमभाव
‘अक्षय लहान असल्यापासून घरी कुणी आल्यास तो त्यांना खाऊ देत असे. आताही इतरांना खाऊ देण्यामध्ये त्याला पुष्कळ आनंद मिळतो. त्या वेळी ‘स्वतःसाठीही थोडा खाऊ शिल्लक ठेवूया’, असा त्याचा विचार नसतो.
३. आज्ञापालन
एकदा एक संत आमच्या घरी आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी अक्षयला सांगितले, ‘‘आता तू दिवाळीच्या अगोदर आश्रमात जा आणि दिवाळी आश्रमातच साजरी कर.’’ तेव्हा त्याने लगेचच आश्रमात जाण्याची सिद्धता केली आणि तो आश्रमात गेला. त्याने दिवाळी आश्रमात साजरी केली. त्यानंतर तो आश्रमात पूर्णवेळ सेवा करू लागला.’
डॉ. भूपालराव शेंडे (आजोबा (आईचे वडील), वय ८३ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि सौ. अनिता अरुण करमळकर (मावशी), कोल्हापूर
१. समंजस
‘अक्षयने लहानपणापासून आतापर्यंत कसलाही हट्ट केला नाही. तो आहे त्या स्थितीमध्ये आनंदी असतो. लहानपणी त्याचे आई-बाबा सेवेनिमित्त बाहेर असायचे. त्या वेळी तो घरी एकटा असायचा. आई-बाबा घरी आल्यानंतरच तो जेवायचा.
२. काटकसरीपणा
तो नेहमी कोणतीही वस्तू अगदी जपूनच वापरतो. त्याची लहानपणीची खेळणीही त्याने अजून सांभाळून ठेवली आहेत. तो कपडेही आवश्यक तेवढेच घेऊन ते व्यवस्थित वापरून पूर्ण खराब झाल्यानंतरच नवीन विकत घेतो. संगणकीय प्रत काढतांनाही तो कागदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न असतो.
३. इतरांना साहाय्य करणे
तो महाविद्यालयात असतांना मित्रांना अडचणीच्या वेळी साहाय्य करायचा. तो त्यांच्या वडिलांना ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे इत्यादी सेवा करण्यासाठी आणि मावशीला विज्ञापनांच्या सेवेमध्ये साहाय्य करायचा. वेळ मिळाल्यावर तो आश्रमात जाऊन तेथील भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणक (लॅपटॉप) यांच्या संदर्भातील अडचणी सोडवायचा.
४. सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे
अक्षय विज्ञापनांची संरचना करायचा. ‘त्या वेळी विज्ञापने सात्त्विक आणि आकर्षक कशी होतील ?’, यासाठी तो प्रयत्न करायचा. ‘विज्ञापनांमध्ये व्याकरणदृष्ट्या किती चुका झाल्या ?’, याचा तो अभ्यास करायचा आणि ‘पुढील वेळी त्या चुका पुन्हा होऊ नयेत’, यासाठी प्रयत्न करायचा.’
सौ. सुवर्णा बाळासाहेब शेजवळे (आईची मावशी, वय ५९ वर्षे), ईश्वरपूर, जिल्हा सांगली
इतरांचा विचार करणे : ‘मला माझ्या गावी, म्हणजे ईश्वरपूर येथे जायचे होते. त्या वेळी तो रामनाथी आश्रमातून पुष्कळ प्रवास करून नुकताच घरी आला होता, तरीही तो मला बसस्थानकावर पोचवण्यासाठी आला.’
सौ. रूपाली सागर बराले (मावशी), कोल्हापूर
‘लहानपणापासूनच त्याच्यामध्ये ‘प्रेमभाव, इतरांचा विचार करणे’ इत्यादी गुण आहेत.’
(सर्व सूत्रांचा मास : नोव्हेंबर २०२१)
साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. ‘चि. अक्षय सतत आनंदी असल्याने त्याला पाहिल्यावर सर्वांना आनंद वाटतो.
२. प्रेमभाव
एकदा एक साधक सेवा करत होता. त्या वेळी त्याला पुष्कळ त्रास होऊन चक्कर येत होती. साधकाला सेवा करायला जमत नव्हते. त्या वेळी अक्षय तेथे सहज आला होता. साधकाची प्रकृती ठीक नसल्याचे त्याच्या लक्षात आले. तेव्हा त्याने साधकाला विश्रांती घेण्यास सांगून त्याची सेवा पूर्ण केली.
३. सर्वांशी जवळीक साधणे
अक्षय नवीन आलेले साधक किंवा बाहेरील व्यक्ती यांच्याशी सहजतेने जवळीक साधतो आणि त्यांना आपलेसे करतो. तो त्यांच्याशी अत्यंत मोकळेपणाने वागतो. त्याच्या या गुणामुळे त्याने अल्प कालावधीत आश्रमातील अनेक जणांशी जवळीक साधली आहे.
४. इतरांचा विचार करणे
कोल्हापूर येथे भ्रमणभाषच्या संदर्भातील साहित्य अतिशय अल्प दरामध्ये मिळते. ‘साधकांना आवश्यक असलेले साहित्य अल्प दरात मिळावे आणि त्यांचे पैसे वाचावेत’, या दृष्टीने ते साहित्य घेऊन साधकांना उपलब्ध करून देण्यासाठी तो पुष्कळ तळमळीने प्रयत्न करतो. प्रत्येक वेळी दुकानदाराकडे नवीन वस्तू आल्यास ‘त्या वस्तू कुणाला आवश्यक आहेत का ?’, हे तो विचारून घेतो.
५. साधकांना सेवेत साहाय्य करणे
एकदा एका खोलीत संत रहायला येणार होते. त्या वेळी तेथे एक सेवा करायची होती. हा निरोप आम्हाला रात्री १२ वाजता मिळाला. त्या वेळी आमच्यासमवेत सेवा करणार्या एका साधकाची प्रकृती बरी नव्हती. आम्ही अक्षयला साहाय्य करण्याविषयी विचारले असता तो लगेच सिद्ध झाला आणि त्याने ती सेवा पूर्ण केली. ‘अक्षयला सांगितल्यावर तो सेवा पूर्ण करणारच !’, अशी आम्हाला निश्चिती असते.
६. शिकण्याची वृत्ती
संगणकाची दुरुस्ती करण्याच्या समवेत त्याला ‘कोरल’, ‘फोटोशॉप’ आणि ‘व्हिडिओ एडिटिंग’ यांचीही आवड असल्याने तो त्यांतील बराचसा भाग शिकला आहे. त्यामुळे साधकांच्या अडचणी सोडवतांनाही त्याला त्याचे साहाय्य होते.
७. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
मध्यंतरी काही दिवस त्याची व्यष्टी साधना आणि सेवा होत नव्हती. त्यामुळे त्याने लिहून दिले, ‘माझी व्यष्टी साधना होत नाही. मला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेसाठी पाठवा.’ नंतर त्याने स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवायला आरंभ केला. त्या वेळी आढावासेवकाने त्याला सांगितले, ‘‘तुझी स्वयंसूचनांची १५ सत्रे व्हायला पाहिजेत, तसेच तू सारणीत प्रतिदिन ५ तरी चुका लिहायला पाहिजेत.’’ त्यानंतर तो न चुकता सारणी लिखाण करायचा आणि सत्रे पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा.
८. सेवेची तळमळ
अ. मध्यंतरी तो घरी गेलेला असतांनाही त्याने आमच्याकडे सेवा मागितली आणि ती पूर्ण केली.
आ. त्याच्याकडे आलेली कोणतीही सेवा तो अल्प वेळेत आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
९. कोणतीही चुकीची गोष्ट घडली, तर अक्षय ती त्वरित संबंधित साधकाच्या लक्षात आणून देतो आणि ‘त्यात काय पालट करायला हवा ?’, हेही सांगतो.
१०. संतांची सेवा भावपूर्ण करणे
‘न्यूरोथेरपी’ ही उपचारपद्धत शिकल्यामुळे अनेक वेळा त्याला संतांच्या सेवेची संधी मिळते. ही सेवा तो अत्यंत भावपूर्ण करतो.’ (११.११.२०२१)
श्री. संकेत भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. व्यवस्थितपणा
‘मी आणि अक्षय एकाच खोलीत रहातो. खोलीतील कपाटात त्याचे कपडे एकदम व्यवस्थित ठेवलेले असतात. खोलीतील मांडणीमध्ये इतरांचे साहित्य अव्यवस्थित असेल, तर तो स्वतःहून वेळ देऊन ते साहित्य व्यवस्थित ठेवतो.
२. प्रेमभाव
खोलीत त्याचे आणि माझे कपाट शेजारी-शेजारी आहे. खोलीत आम्ही दोघे एकत्र असलो की, तो मला सांगतो, ‘‘तू कधीही माझे कपाट उघडून माझ्या वस्तू घेऊ शकतोस.’’
३. संतांची सेवा भावपूर्ण करणे
तो पू. सौरभदादांची (सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी यांची) सेवा भावपूर्ण करायचा.’ (१५.११.२०२१)
चि.सौ.कां. वैष्णवी जाधव यांची कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
श्री. विष्णुपंत जाधव (वडील, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), अकलूज, जिल्हा सोलापूर आणि (पू.) सौ. संगीता विष्णुपंत जाधव (आई), ठाणे सेवाकेंद्र
१. समंजस
‘चि.सौ.कां. वैष्णवी तिच्या वयाच्या तिसर्या वर्षापासून साधक असलेल्या जबडे कुटुंबियांकडे जायची आणि त्यांच्याकडेच आनंदाने रहायची. त्यामुळे मला (आईला) सेवेसाठी बाहेर जाता येत असे. मामाकडे रहायचे ठरले, तरी तिकडे जातांनाही ती कधीच रडत नसे. ती नेहमी आनंदी असायची.
२. लहानपणी ती सर्वांकडे जात असल्याने सर्व जण ‘ती घरी यावी’, याची वाट पहायचे. ती नेहमी हसतमुख असायची.
३. उत्तम निरीक्षणक्षमता
घरातील चर्चेत ती सहभागी नसायची; परंतु ‘सर्व जण कशा प्रकारे बोलले ?’, याविषयी ती कधीतरी मला सांगायची.
४. ती एखाद्या व्यक्तीविषयी चुकीचे मत कधीच व्यक्त करत नाही.
५. इतरांचा विचार करणे
आतापर्यंत आम्ही दोघेच तिच्यासाठी कपडे विकत घेत होतो. तिने ‘हा रंग मला आवडला नाही. मला हा नको’, असे एकदाही म्हटलेले आम्हाला आठवत नाही. त्या मागे ‘इतरांना वाईट वाटायला नको’, असा तिचा विचार असतो. याविषयी ती म्हणते, ‘‘वस्तू किती दिवस टिकते ? परंतु व्यक्तीचे मन दुखावले, तर ते कायमचे मनात रहाते ना !’’
६. ऐकण्याची वृत्ती
तिला मैत्रिणींच्या समवेत जायचे असतांना आम्ही ‘बाहेर जायला नको’, असे सांगितले, तर तिने ‘मला जायचे आहे’, असे उलट उत्तर देऊन हट्ट केलेला आम्हाला आठवत नाही.
७. वर्तमानकाळात आनंदी रहाण्याचा प्रयत्न करणे
तिला भूतकाळात कुणी काही बोलले असेल, तरी ती ‘ते विसरून मला त्यांच्या समवेत आनंदी रहायचे आहे’, असा विचार करते आणि तशी कृती करते. ती ‘भविष्यात कसे करावे लागेल ?’, याचा विचार कधी करत नाही. आपण तिला त्याविषयी विचारले, तर ती म्हणते, ‘‘गुरुदेव आहेत ना ? ते सर्व करवून घेतील.’’ ती वर्तमानातील क्षणात आनंदी रहाण्याचा प्रयत्न करते.
८. एखादा प्रसंग घडला आणि तिला त्याचे वाईट वाटले, तर ती थोडा वेळ शांत बसते अन् थोड्या वेळाने तो प्रसंग विसरून मनमोकळेपणाने बोलते.
९. ती स्वतःच्या मनाने निर्णय न घेता इतरांना विचारून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे निर्णय घेते.
१०. ‘देवाला आवडेल’, असे वागण्याचा प्रयत्न करणे
वैष्णवी आमची लाडकी लेक तर आहेच; परंतु तेवढीच ती देवाची लाडकी आहे. आमच्यापेक्षा ती परात्पर गुरुदेव, आश्रम आणि साधक यांच्या समवेतच आनंदी रहाते अन् ‘देवाला आवडेल’, असे वागण्याचा प्रयत्न करते.
तिच्या भावी आयुष्यातील साधनेसाठी देवाने तिला एक जोडीदार दिला आहे. ‘त्याच्यासह तिचा पुढील साधनाप्रवास आनंदाने आणि देवाला अपेक्षित असाच होवो अन् देवाने त्या दोघांकडून साधना करवून घ्यावी’, अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !’ (नोव्हेंबर २०२१)
श्री. प्रतीक जाधव (मोठा भाऊ), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा
१. प्रगल्भता
‘मी वैष्णवीपेक्षा ७ वर्षांनी मोठा आहे; परंतु तिच्या वागण्या-बोलण्यातील आणि विचारांतील प्रगल्भतेमुळे तसे कधीच जाणवले नाही. उलट अनेक जण म्हणतात, ‘‘वैष्णवी तुझी मोठी बहीण आहे का ?’’
२. उत्तम आकलनक्षमता
तिची समजून घेण्याची क्षमता पुष्कळ आहे. तिच्याशी एखाद्या विषयाच्या संदर्भात मनमोकळेपणाने बोलतांना माझ्या मनात ‘ती लहान आहे’, असा विचार क्वचित् येतो.
३. इतरांकडून शिकणे
वैष्णवी ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’, या म्हणीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करते. माझ्या अनुभवांतून ती शिकण्याचा प्रयत्न करते.
सौ. कीर्ती प्रतीक जाधव (वहिनी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘माझ्या विवाहाच्या आधीपासूनच आम्ही दोघी गुरुकुलात एकत्र असल्याने आम्ही मैत्रिणी आहोत. माझा विवाह झाल्यावर आम्हा दोघींमध्ये मी कधीच नणंद-भावजयीचे नाते अनुभवले नाही. मला तिचा सहवास हवाहवासा वाटतो. मला तिचा पुष्कळ आधार वाटतो.
१. प्रेमभाव
ती घरातील कोणतेही काम मला एकटीला कधीच करू देत नाही. जास्त काम केल्यावर मला दमायला होते. तेव्हा ती मला हक्काने ‘तू थांब. मी करते’, असे सांगून स्वतः ते काम पूर्ण करते.
२. काही वेळा घरी मला एखाद्या गोष्टीचा ताण आल्यास किंवा कधी मनाचा गोंधळ झाल्यास या गोष्टींविषयी वैष्णवीशी बोलल्यावर त्या सहज अन् सोप्या होतात.
३. वहिनीला बर्याच प्रसंगांमध्ये ‘कसे असायला हवे ?’, हे सहजतेने सांगणे
मी तिच्यापेक्षा मोठी असूनही एवढ्या वर्षांमध्ये ‘मी तिला कुठल्या गोष्टींसाठी समजावले’, असे न होता बर्याच प्रसंगांमध्ये ती मला ‘आपण कसे असायला हवे आणि आपण काय करूया ?’, हे सांगते. हे सर्व करत असतांना तिच्या बोलण्यात कुठेच शिकवण्याची वृत्ती किंवा कर्तेपणा जाणवत नाही. हे सर्व ती अगदी सहजतेने करते.
४. अनेक गुणांचा संगम असलेली वैष्णवी !
वैष्णवी एक चित्रकार, लेखिका आणि कवयित्रीही आहे. तिच्यामध्ये उत्तम निर्णयक्षमता आहे. भगवंताने तिच्यामध्ये अनेक गुणांचा संगम केला आहे. तिचे मन अनेक सुंदर गुणांनी आणि भगवंताप्रतीच्या भावाने नटलेले आहे.
व्यावहारिक जीवनात नणंदेचा विवाह झालेला असेल किंवा होणार असेल, तर वहिनीला ‘हुश्श’ होते. मला वैष्णवीचा विवाह ठरल्यावर आनंद झाला; परंतु ‘आता माझे कसे होणार ?’, असाही विचार माझ्या मनात आला.’ (१३.११.२०२१)
साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
कु. गुलाबी धुरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. प्रेमभाव
अ. ‘काही दिवस मी वैष्णवीताईच्या समवेत आश्रमात येणार्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याच्या सेवेत होते. कधी कधी पाहुण्यांना जेवायला यायला उशीर व्हायचा. त्या वेळी ताई मला जेवून घ्यायला सांगायची आणि तोपर्यंत पाहुण्यांना जेवण वाढण्याच्या सेवेसाठी अन्य साधिकेचे नियोजन करायची.
आ. एखाद्या साधिकेचे हात किंवा खांदे दुखत असल्यास ताई बिंदूदाबन करून देते. त्यानंतर त्या साधिकेचा थकवा किंवा दुखणे न्यून होते.
इ. मी कधी कधी गंभीर तोंडवळा करून बसल्यावर ताई माझ्या मागून येऊन मला हसवण्याचा प्रयत्न करायची.
२. ताईला आध्यात्मिक त्रास होता; परंतु काही मासांतच तिने व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करून त्या त्रासांवर तळमळीने मात केली आणि तिचा त्रास न्यून झाला.
३. पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याच्या सेवेत अन्य काही महत्त्वाच्या सेवा आल्या, तरीही ती त्या सेवा समयमर्यादेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत असते.’ (१६.११.२०२१)
कु. मानसी अग्निहोत्री, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. उत्तम निरीक्षणक्षमता
‘एकदा आम्ही दोघी एकत्र सेवा करत होतो. त्या वेळी ‘सेवा करण्यात मी कुठे चुकले ? माझे काय राहिले ?’, हे तिने मला सांगितले.
२. उत्तम कवयित्री
एखाद्या साधिकेचा वाढदिवस असल्यास वैष्णवी तिच्यावर उत्तम कविता करते. संबंधित साधिकेशी तिच्याशी तेवढा संपर्क नसला, तरीही ती संबंधित साधिकेचे अचूक वर्णन करून वेगळ्या प्रकारे कविता सिद्ध करते आणि ती कविता सर्वांनाच आवडते.’ (२६.११.२०२१)
सौ. सुमुखी सुयोग आठवले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘तिच्या मनात समाजातील दुष्प्रवृत्तींविषयी चीड आहे. समाजात घडलेल्या चुकीच्या घटनांचा ती योग्य शब्दांत निषेध करते.’ (२६.११.२०२१)