धर्माचरणी, प्रेमळ आणि परात्पर गुरुदेवांप्रती अनन्य भाव असलेले कोल्हापूर येथील सौ. मीरा अन् श्री. चंद्रकांत कात्रे !

‘आमचे व्याही कोल्हापूर येथील श्री. चंद्रकांत कात्रे आणि त्यांच्या पत्नी सौ. मीरा कात्रे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. चंद्रकांत कात्रे आणि त्यांच्या पत्नी सौ. मीरा कात्रे

१. धर्माचरणी

‘श्री. आणि सौ. कात्रे धार्मिक वृत्तीचे अन् धर्माचरणी आहेत. त्यांची घरातील सणवार आदी कृती धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे परिपूर्ण करण्याची धडपड असते.

२. मुलांवर सुसंस्कार करणे

त्यांनी त्यांची दोन्ही मुले श्री. मनोज आणि श्री. राघव यांच्यावर चांगले संस्कार केले आहेत. त्यांची दोन्ही मुले निर्व्यसनी आणि गुणी आहेत.

श्री. मधुसूदन कुलकर्णी

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्य भाव असलेले कात्रे दांपत्य ! 

उभयतांचा परात्पर गुरु डॉ. आठवले (परात्पर गुरुदेव) यांच्याप्रती अपार भाव आहे. ‘प्रत्येक सेवा गुरुदेवच आमच्याकडून आध्यात्मिक प्रगतीसाठी करून घेत आहेत’, असा त्यांचा भाव असतो आणि त्यांच्या वागण्या-बोलण्यातून तो व्यक्त होतो.

विवाहाच्या संदर्भातील कृती करतांना ‘गुरुदेवांची सेवा करत आहे’, असा कात्रेकाकांचा भाव जाणवायचा. आम्ही पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो, तेव्हा गुरुदेवांच्या संदर्भात विषय निघाला. गुरुदेवांनी ‘आतापर्यंत आपल्यासाठी काय काय केले ?’, असे बोलणे चालू असतांना काकांच्या डोळ्यांत भाव तरळला आणि त्यांचे डोळे पाणावले.

४. सनातनच्या आश्रमांविषयी भाव 

त्यांचा मुलगा श्री. मनोज यांना लग्नासाठी समाजातील अनेक चांगल्या मुली मिळाल्या असत्या; पण ‘मुलगी सनातनची साधिका हवी’, असा दोघांचाही (कात्रे दांपत्याचा) आग्रह होता. ‘सई गुरुदेवांच्या आश्रमात राहिली आहे’, हे कळल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला. सईला न भेटताच त्यांनी ‘आश्रमातील मुलगी असल्याने आम्हाला सई पसंत आहे’, असे कळवले. आम्ही पहिल्यांदा त्यांच्या घरी जाणार होतो, तेव्हा ‘सईच्या माध्यमातून राधाच घरी येणार आहे’, असा भाव असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले.

परात्पर गुरुदेवांमुळे आमची कात्रे कुटुंबाशी जवळीक झाली आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. गुरुदेवांच्या कृपेमुळे हे नातेसंबंध जुळून आले. कात्रेंच्या घरी सर्व जण साधना करणारे असल्यामुळे आता आम्हाला ‘सई लग्न करून परक्या ठिकाणी जाणार’, असे वाटत नाही. गुरुदेवांच्या आश्रमातील संस्कार घेऊन सई आता कात्रे कुटुंबात प्रवेश करणार आहे. ‘कात्रे कुटुंबीय सईला सून म्हणून नव्हे, तर मुलगी म्हणून स्वीकारतील’, हे लक्षात आल्याने आम्ही निश्चिंत झालो आहोत.

‘हे गुरुदेवा, तुमच्या कृपेमुळेच सईला सात्त्विक, धर्माचरणी आणि प्रेमळ सासर मिळाले, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. सुजाता आणि श्री. मधुसूदन कुलकर्णी (श्री. मधुसूदन कुलकर्णी यांची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के आहे.) (कात्रे यांचे व्याही), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.११.२०२१)