तंत्रज्ञान क्षेत्रासह भारताचा योग आणि आयुर्वेद यांच्या संशोधनावरही भर ! – धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील ‘इंडो फ्रेंच नॉलेज समिट’ !

पुणे – भारताने कृत्रिम बुद्धीमत्तेच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रात भर देण्यासह सामाजिक सुधारणा करण्यासाठी योग आणि आयुर्वेद यांच्या संशोधनावरही भर दिला आहे, असे मत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘इंडो फ्रेंच नॉलेज समिट’ला प्रारंभ झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी फ्रान्सचे उच्च शिक्षण संशोधन आणि नवसंशोधन मंत्री फेडरिक्यु विडाल, केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. एम्. रविचंद्रन, कुलगुरु डॉ. नितीन करमळकर उपस्थित होते.

‘फ्रान्सने आगामी दहा वर्षांत राष्ट्रीय अभ्यासकांसाठी २५ अब्ज युरोची तरतूद केली आहे, तसेच वर्ष २०२५ पर्यंत फ्रान्समध्ये संशोधनासाठी जाणार्‍या भारतीय संशोधकांची संख्या दुप्पट करण्याचा मानस आहे’, असे मत फ्रान्सचे उच्च शिक्षण आणि नवसंशोधन मंत्री फेडरिक्यु विडाल यांनी व्यक्त केले.