मृत्योपनिषद – मृत्यूविषयी धर्मग्रंथांमध्ये केलेले विवेचन

सहजपणे येणारा मृत्यू हा चांगला, तर परमेश्वराचे नामस्मरण करत येणारा मृत्यू म्हणजे अतीउत्तम मृत्यू, हे जाणून आतापासून साधना करणे आवश्यक !

सध्या कोरोनामुळे सर्वत्र मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मृत्यूविषयी वस्तूस्थिती कळावी; म्हणून हा लेख दिला आहे.

१. ‘जगात सर्वांत आश्चर्यजनक गोष्ट कोणती ?’ या यक्षच्या प्रश्नाला युधिष्ठिराने पुढील उत्तर दिले.

अहन्यहनि भूतानि गच्छन्तीह यमालयम् ।
शेषाः स्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम् ।।

– महाभारत, पर्व ३, अध्याय ३१४, श्लोक ११८

अर्थ : प्रतिदिन लोक यमसदनी जात आहेत (मृत्यू पावत आहेत), तरीही उरलेल्या प्रत्येकाला सदैव जीवित रहाण्याची इच्छा असते. याहून मोठी आश्चर्याची गोष्ट कुठली ?

युधिष्ठिराने यक्षाला दिलेल्या उत्तराचा मतितार्थ असा आहे की, ‘जगात प्रत्येक जण अशा थाटात वावरत असतो की, जणू तो अमरत्वच घेऊन जन्माला आला आहे’, हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे.

२. ‘अधिक वय झाल्यावर मृत्यू येणे’, ही एक नैसर्गिक प्रक्रिया असणे, मनुष्य ‘आयुष्य सुखाचे जावो’, अशी इच्छा करतो, तेव्हा ‘मृत्यू’ हा आयुष्याचा अंतिम भाग आहे’, याचे त्याला विस्मरण होणे

मनुष्याला अकाली मरण आले, तर त्यापासून होणारे दुःख अतीतीव्र आणि शब्दातीत असते; पण ‘मनुष्याला त्याच्या परिपक्व वयात (वय अधिक झाल्यावर) मृत्यू येणे आणि त्याला आनंदाने सामोरे जाणे’, ही एक नैसर्गिक प्रक्रिया असायला हवी; परंतु वाघ समोर दिसल्यावर भीतीने जशी गाळण उडते, तशीच अवस्था ‘मृत्यू’ म्हटल्यावर पुष्कळांची होते. ‘आयुष्याचा शेवट गोड व्हावा’, असे आपण म्हणतो. ‘आयुष्य सुखाचे जावो’, ही इच्छा करत असतांना ‘मृत्यू हाही आयुष्याचा एक अंतिम भाग आहे’, हे आपण विसरत असतो.

३. ‘मृत्यूला आनंदाने सामोरे जाणे’, हे प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून असणे

‘मृत्यू केव्हा तरी येणार’, हे प्रत्येकालाच ठाऊक असते; पण त्याचा स्वीकार करणे जड जाते. मृत्यूचा काय विचार करायचा ? नाहीतरी तो केव्हा तरी येणारच आहे. मग त्याचा विचार आताच कशाला ? ‘मृत्यू’ हा आनंददायी आणि सुखद होऊ शकतो का ? अर्थात् हे प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून असते. मृत्यूचे स्वागत करणारे आणि त्याला आनंदाने सामोरे जाणारेही लोक आपल्या देशात होऊन गेले. ‘जगण्याने छळले होते, मरणाने सुटका झाली’, असे कविवर्य सुरेश भट यांनी म्हटले आहे. जाणार्‍या माणसाची आयुष्याच्या छळातून सुटका झाली; पण इतरांना दुःख देत !

४. ‘अनायासेन मरणम्..।’ म्हणजे सहजपणे येणारा मृत्यू हा चांगला मृत्यू, तर परमेश्वराचे नामस्मरण करत येणारा मृत्यू म्हणजे अतीउत्तम मृत्यू !

जीवन कसे पाहिजे ? ‘विना दैन्येन जीवनम् ।’ म्हणजे ‘जीवन दैन्याविना जावे.’ जीवन दैन्याचे आणि लाचारीचे नको. जीवनात सगळ्याच गोष्टी सगळ्यांना मिळतात, असे नाही. त्यासाठी धडपड आणि प्रयत्न करावे लागतात. तरीही त्या पूर्णपणे मिळतीलच, असेही नाही. ‘मृत्यू कसा पाहिजे ?’, असा प्रश्न विचारल्यावर तो ‘नकोच’, असेही उत्तर येऊ शकते; पण ‘नको’ म्हटल्याने मृत्यू चुकत नाही.

अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम् ।
देहान्ते तव सान्निध्यं देहि मे परमेश्वर ।।

अर्थ : ‘हे परमेश्वरा, मला मृत्यू सहजपणे येऊ दे, माझे जीवन कष्टांविना (दैन्याविना) जाऊ दे आणि देहांताच्या वेळी मला तुझे सान्निध्य लाभू दे’, असे म्हटले आहे.

फारसे कष्ट न होता, अंथरूणावर लोळत न पडता, शरीर लोळागोळा, विकलांग, परावलंबी न होता आणि सहजपणे येणार्‍या मृत्यूला चांगले मरण म्हणता येईल; पण सगळ्यांच्या नशिबात ते असतेच, असे नाही. परमेश्वराचे नामस्मरण करत येणार्‍या मृत्यूला अतीउत्तम मरण म्हणता येईल.

५. ‘जन्म-मृत्यूचे हातात हात घालून येणे’ हे समजणे म्हणजे मृत्यूविषयीचे भय आपोआप अल्प होणे, गौतम बुद्धांनी त्यांचे महापरिनिर्वाण जवळ आल्यामुळे रडणार्‍या त्यांच्या शिष्याला ‘मृत्यूसारख्या नैसर्गिक गोष्टीविषयी दुःख करू नको’, असे समजावणे

‘जन्म’ आणि ‘मृत्यू’ या दोन टोकाच्या बिंदूमध्ये मनुष्याचे आयुष्य साठवलेले असते. जन्म-मृत्यूचे हातात हात घालून येणे समजले की, मृत्यूविषयीचे भय आपोआप अल्प होते. जन्म हा जितका नैसर्गिक आहे, तितकाच मृत्यूही नैसर्गिक आहे; पण हे पचवणे फार कठीण आहे. गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण जवळ आले; म्हणून त्यांचा शिष्य आनंद रडत असतांना त्याला समजावतांना गौतम बुद्ध म्हणतात, ‘‘आनंदा, रडू नकोस. मी तुला पूर्वीच सांगितले नाही का ? ‘सर्व प्रिय आवडत्या वस्तूंपासून आपणास वेगळे व्हायचे आहे. जे फुलते, ते कोमेजते. हे कसे शक्य आहे की, पृथक होणे ज्याचा धर्म आहे, ते पृथक होऊ नये ?’’

६. महामृत्यूंजय मंत्रामुळे मृत्यू टाळता येतो; पण त्यावर विजय मिळवता येत नाही

‘महामृत्यूंजय मंत्रामुळे मृत्यू टाळता येतो’, असा समज आहे; पण त्यामुळे मृत्यूवर विजय मिळवता येत नाही; कारण त्या मंत्रात मृत्यू केव्हा यावा ?’, हे सांगितले आहे.

७. समर्थ रामदासस्वामी यांनी मृत्यूविषयी केलेले विवेचन

समर्थ रामदासस्वामी यांनी श्री दासबोधात मृत्यूवर मार्मिक भाष्य केले आहे. ते म्हणतात,

मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवर्ती ।
मृत्य न म्हणे हा करामती । कैवाड जाणे ।।

– दासबोध, दशक ३, समास ९, श्लोक ११

अर्थ : मृत्यू असे म्हणत नाही की, हा भूपती आहे, हा चक्रवर्ती आहे, हा तंत्रमंत्र प्रयोग जाणणारा करामती आहे, हे शहाण्याने जाणावे.

मृत्य न म्हणे शास्त्रज्ञ । मृत्य न म्हणे वेदज्ञ ।
मृत्य न म्हणे सर्वज्ञ । सर्व जाणे ।।

– दासबोध, दशक ३, समास ९, श्लोक २१

अर्थ : मृत्यू असेही म्हणत नाही की, हा शास्त्रज्ञ आहे, हा वेदज्ञ आहे, हा सर्वज्ञ असून सर्व जाणतो.

मृत्य न म्हणे थोर थोर । मृत्य न म्हणे हरिहर ।
मृत्य न म्हणे अवतार । भगवंताचे ।।

– दासबोध, दशक ३, समास ९, श्लोक ४०

अर्थ : माणूस अत्यंत थोर असला, प्रत्यक्ष हरिहर असले किंवा भगवंताचे अवतार जरी असले, तरी मृत्यू त्यांना जुमानित नाही.
(स.२, द.३-मूळ संदर्भ)

८. ‘परमेश्वराचेच मृत्यू किंवा काळ हे प्रत्यक्ष स्वरूप आहे’, हे आपण लक्षात घेत नाही. भगवंत श्रीमद् भगवद्गीतेत सांगतात,

‘मृत्यूः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् ।’

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक ३४

अर्थ : सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणार्‍यांच्या उत्पत्तीचे कारण मी आहे.

‘कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो ।’

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ११, श्लोक ३२

अर्थ : मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाळ आहे.

‘मी अधिष्ठित आहे. मी काळाचाही काळ आहे. परमेश्वर चराचरात आणि अणूरेणूत भरलेला आहे’, असे आपण मानतो. मग त्यापासून मृत्यू अस्पर्श कसा काय राहू शकतो ?

९. आचार्य रजनीश (ओशो) यांच्या समाधीवर पुढील वाक्य लिहिलेले आढळते.

Osho, Never born, Never died
He only visited this planet earth between Dec 11, 1931 – Jan 19, 1990

अर्थ : ओशो कधी जन्माला आले नाहीत आणि कधी मृत्यूही पावले नाहीत. त्यांनी केवळ ११.१२.१९३१ ते १९.१.१९९० या कालावधीमध्ये पृथ्वीला भेट दिली.
‘मनुष्याची उत्तुुंंग बुद्धीमत्ता आणि प्रतिभा यांनी मृत्यूचेही उन्नयन केले आहे’, असे यातून दिसून येते.’

– प्रा. प्रमोद रा. गाडगे

(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, जानेवारी-मार्च २०२१)