कोल्हापूर, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – संघर्ष हीच माझी ओळख आहे, जनतेच्या साथीने पुन्हा यशस्वी होणार, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी केले. श्री. राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस २४ नोव्हेंबर या दिवशी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी युवा नेते श्री. ऋतुराज क्षीरसागर, शहरप्रमुख श्री. जयवंत हारुगले, माजी नगरसेवक श्री. नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक श्री. रविकिरण इंगवले यांसह अन्य उपस्थित होते.
सकाळी श्री. राजेश क्षीरसागर यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा आणि त्यांच्या पत्नी सौ. वैशाली क्षीरसागर यांनी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी आणि श्री जोतिबा यांचे दर्शन घेतले. यानंतर पांजरपोळ येथे गोमातेचे पूजन करून गायींना डाळ, गूळ, चारा यांचे वाटप करण्यात आले. यानंतर शिवसेना फेरीवाले सेनेच्या वतीने गोरगरिबांना भोजन देण्यात आले, तसेच युवा सेनेच्या वतीने ‘श्री जोतिबा येथे अभिषेक अर्पण करून श्री. राजेश क्षीरसागर यांना उदंड आयुष्य लाभावे’, असे साकडे घालण्यात आले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्री. राजेश क्षीरसागर यांना शुभेच्छा !
हिंदु जनजागृती आणि सनातन संस्था यांच्या वतीने श्री. राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी श्री. क्षीरसागर यांना हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘गोसंवर्धन’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. या प्रसंगी सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री, श्री. शिवानंद स्वामी, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदुत्वनिष्ठ श्री. सचिन गुरव यांसह अन्य उपस्थित होते.
श्री. क्षीरसागर यांचे वेळोवेळी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेच्या कार्याला सहकार्य असते. श्रावण मासाच्या समाप्तीच्या वेळी सर्व हिंदूंच्या एकत्रिकरणासाठी श्री. क्षीरसागर यांच्याकडून प्रत्येक वर्षी उपवास सोडण्यासाठी ‘श्रावण व्रतवैकल्य’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असे.