शहारातील एकटेपणा हा जगभरात गंभीर आजार ठरला आहे ! – दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन्

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘द नॉकर’ हा नॉन फिचर गटातील चित्रपट प्रदर्शित

दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन्

पणजी, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यात चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘द नॉकर’ हा नॉन फिचर फिल्म गटातील चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात शहरामध्ये रहाणार्‍या माणसाला जाणवणारा एकटेपणा आणि त्याच्या मनाची अवस्था यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्व जग डिजिटल तंत्रज्ञानामुळे सर्व जग जोडले गेले असले, तरी आताच्या आधुनिक शहरी जगात एकटेपणा आणि वेगळेपणा यांची जाणीवही वाढत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन् २४ नोव्हेंबर २०२१ या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘‘शहरामध्ये आम्ही आमच्या क्षेत्राच्या बाहेर असलेल्या जीवनाविषयी असंवेदनशील असतो. आम्ही मनातून अतिक्रियाशील आणि अति भावनाशील झालो आहोत. जगभरात एकटेपणा हा गंभीर आजार पसरत आहे. त्याचा मानवी मनावर परिणाम होत आहे. ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी त्याकडे लक्ष द्यायला हवे. मी एका पुस्तकामध्ये वाचले होते, ‘एक अमेरिकी माणूस त्याच्या बंगल्यात एकटाच रहातो. अचानक त्याच्या मनात ‘आपण घरात एकटेच नाही’, अशी विचित्र भावना निर्माण होते. त्यानंतर त्याच्या मनाचे खेळ चालू होतात. ‘घराचा दरवाजा कोणीतरी ठोठावत आहे’, असे त्याला वाटते; परंतु दरवाजा उघडला, तर बाहेर कोणीच नसते.’’ या चित्रपटात माणसाच्या एकटेपणातील मनाची स्थिती काही प्रसंगांतून दाखवण्यात आली आहे.

कोरोना महामारीच्या काळात या चित्रपटाचे निर्माते अश्विन गिडवानी यांनी अनंत महादेवन् यांना चित्रपट काढण्याविषयी विचारले. त्या काळात तंत्रज्ञ आणि अभिनेते उपलब्ध नव्हते. बर्‍याच तांत्रिक गोष्टी त्यांनी स्वतः शिकून घेतल्या आणि या चित्रपटाची निर्मिती केली.