प्रेमळ आणि इतरांना साहाय्य करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. गायत्री जोशी (वय २६ वर्षे) !

कार्तिक कृष्ण पक्ष सप्तमी (२६.११.२०२१) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्‍या कु. गायत्री जोशी यांचा २६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त रामनाथी आश्रमातील साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. गायत्री जोशी

कु. गायत्री जोशी यांना २६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

लेखिका – श्रीमती मीरा करी (वय ६४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. ‘कु. गायत्री सरळ स्वभावाची आहे. ती सर्वांचे केवळ गुणच पहाते. तिचे बोलणे लहान मुलांप्रमाणे निरागस आणि प्रेमळ आहे.

२. प्रेमभाव : ती आश्रमात नवीन असली, तरी सर्वांशी मिळून-मिसळून वागते. काही साधक घरून येतांना तिच्यासाठी खाऊ आणतात. तेव्हा ती तो खाऊ स्वतः न खाता तिच्या सहसाधकांनाही देते. ती म्हणते, ‘‘दुसर्‍यांना खाऊ दिल्याने मला खाऊ खाण्यातील आनंद मिळतो.’’

३. ती वयाच्या २० व्या वर्षापासून प्रतिदिन पहाटे ३ वाजता उठते आणि गार पाण्याने अंघोळ करून नामजप अन् प्राणायाम करते.

४. साधकांना साहाय्य करणे : आश्रमात काही वेळा साधकसंख्या अल्प असल्यास ती इतर साधकांना सेवेत साहाय्य करते. साधकांना शारीरिक अडचणी असल्यास किंवा साधक अकस्मात् रुग्णाईत झाल्यास गायत्री त्यांना साहाय्य करते. ती ही सेवा मनापासून करते. सर्व साधकांना गायत्रीचा आधार वाटतो.

५. मायेतील गोष्टींची आसक्ती नसणे : तिची आई तिला मूल्यवान आणि अत्याधुनिक भ्रमणभाष संच घेऊन देणार होती. तेव्हा ती आईला म्हणाली, ‘‘अशा भ्रमणभाषचा अनावश्यक वापर झाल्यास माझ्या साधनेचा वेळ वाया जाईल. मला असला भ्रमणभाष नको.’’ (५.११.२०२१)

लेखिका – कु. मनुश्री साने (वय १७ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. आनंदी आणि उत्साही : ‘गायत्रीताई सतत आनंदी असते. ती सेवेसाठी सदैव तत्पर असते. ती मनापासून आणि उत्साहाने सेवा करते. ती आत्मीयतेने आणि उत्साहाने इतरांनाही साहाय्य करते.

२. प्रेमभाव : ताईमधील प्रेमभाव तिच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येतो. एकदा मला जेवण वाढून द्यायचे होते. त्या वेळी तिने स्वतः जेवत असतांना मधेच उठून मला जेवण वाढले आणि ‘तुला काही हवे आहे का ?’, असे २ – ३ वेळा विचारून माझ्या डोक्यावरून हात फिरवला. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली. तिच्या प्रेमभावामुळे ती मला माझी ताईच वाटते. एकदा मी तिला तसे म्हटल्यावर ती मला म्हणाली, ‘‘मी किती भाग्यवान आहे की, मला तुझ्यासारखी लहान बहीण मिळाली !’’

३. ती स्वतःच्या चुकांचे चांगले निरीक्षण करते आणि त्या चुका प्रांजळपणे व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगते.

४. ती एकाग्रतेने आणि परिपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करते. ती मनापासून सेवा करत असल्याने सेवेतील बारकावे तिच्या लक्षात येतात.

‘हे गुरुमाऊली, ‘तुम्हीच मला गायत्रीताईसारखी आध्यात्मिक बहीण दिलीत आणि तिचे विविध गुण दाखवलेत’, याबद्दल तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘मला ताईमधील गुण शिकता येऊन ते आत्मसात करता येऊ देत’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना !’ (१६.११.२०२१)