प्रदूषणाविषयी देशाच्या राजधानीचे हाल पहाता आपण जगाला काय संदेश देत आहोत ? – सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

प्रत्येक सूत्रांसाठी न्यायालयात धाव घेऊन सरकारला आदेश द्यावा लागत असेल, तर सरकारी यंत्रणा नावाचा डोलारा हवाच कशाला ? – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली –  हवामान बिघडले की, उपाययोजना केल्या जातात. हे उपाय प्रदूषण रोखण्याच्या आधी करायला हवे आणि ते सांख्यिकीय रचनेवर आधारित असले पाहिजेत; परंतु राजधानीतील प्रदूषणाची विषारी पातळी जगासमोर देशाची नकारात्मक प्रतिमा मांडत आहे. देशाच्या राजधानीचे हे हाल आहेत, तर कल्पना करा, आपण जगाला यातून काय संदेश देत आहोत ?, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले.

सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले, ‘देहलीच्या हवेतील गुणवत्तेचा निर्देशांक २४ नोव्हेंबरला सकाळी २९० (५० पर्यंतचा निर्देशांक चांगला असतो) होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा चांगला आहे. आधी तो ४०३ होता.’ त्यावर सरन्यायाधिशांनी अप्रसन्नता व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले, ‘गेल्या काही दिवसांत प्रदूषणात घट झाली. त्याचे श्रेय हवेला जाते. ते तर ‘ईश्‍वरी कार्य’ आहे; परंतु सायंकाळपर्यंत हवा खेळणे बंद होईल, मग राजधानी प्रदूषणाच्या दयेवर अवलंबून असेल. हवेमुळे आपण वाचलो. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार सायंकाळपर्यंत स्थिती गंभीर होऊ शकते. आता हवेचा वेग २-३ किमी आहे. सायंकाळी शून्यावर येईल. तुम्ही २९० सांगत आहात; परंतु आता आम्ही भ्रमणभाषवर हवेचा गुणवत्ता निर्देशांक पाहिला. तो ३१८ दिसला. हा आकडा पुन्हा गंभीर होऊ शकतो. आम्ही दिलेल्या निर्देशानुसार उपाय केला जावा. आम्ही निगराणी चालूच ठेवू. २९ नोव्हेंबरला आम्ही पुन्हा सुनावणी करू. पातळी २०० किंवा काहीशी खाली आल्यास तुम्ही निर्बंध हटवू शकता.’