आमदार शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर शरद पवार यांची सातारा येथे बैठक

जिल्हा अधिकोष निवडणुकांतील घाणेरडे पक्षीय राजकारण !

डावीकडून शरद पवार आणि शशिकांत शिंदे

सातारा, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ‘राष्ट्रवादी भवना’त दगडफेक केली. यामुळे सातारा येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर शरद पवार यांनी आमदार शशिकांत शिंदे यांची समजूत काढत तातडीने सातारा विश्रामगृहावर बैठक घेतली.

बंद खोलीत झालेल्या चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही; मात्र बैठक संपल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांना आमदार शशिकांत शिंदे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्हा बँक निवडणुकीविषयी २५ नोव्हेंबर या दिवशी मी स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार आहे. तेव्हाच बोलणार आहे. आता मी मोकळा असल्यामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे कार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. निवडणुकांमध्ये विजय-पराजय या गोष्टी घडत असतात. पुढे सातारा नगरपालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामध्ये लक्ष घालणार असून जावळी आणि सातारा तालुक्यांत राष्ट्रवादीची शक्ती दिसून येईल.