संस्कृतीच्या माहेरघरात राष्ट्रपुरुष उपेक्षितच !

नोंद 

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे

भारत हा असा देश आहे की, जिथे गड-किल्ले, पुरातन वास्तू, स्मारके, तसेच ऐतिहासिक वारसा परंपरा जतन करण्यात उदासीनताच आढळून येते. ही उदासीनता शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक अशा सर्वच स्तरांवर आढळून येते. पुणे शहरातील बाजीराव रस्त्यावर ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ असा उल्लेख असलेली पाटी गेल्या अडीच वर्षांपासून बसवण्यात आलेली नाही. ‘ही पाटी लावण्यासाठी निधी उपलब्ध नसून प्रायोजक आणल्यास पाटी लावू’, असे धक्कादायक उत्तर महापालिकेच्या अधिकार्‍यांनी पेशव्यांच्या वंशजांना दिले आहे. ज्यांनी अटकेपार झेंडे फडकवले, अशा दैदीप्यमान इतिहास असणार्‍या बाजीराव पेशवे यांच्या नावाची पाटी लावण्यासाठीही जर पुणे महापालिकेकडे पैसे नसतील, तर यापेक्षा दुर्दैव ते काय ?

चिमाजी अप्पा

पुणे महापालिका क्षेत्रात झालेला हा पहिलाच प्रकार आहे, असे नाही. लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौक ते मित्रमंडळ चौक या रस्त्याला ‘चिमाजी अप्पा’ नावाच्या पाटीचीही दुरवस्था झाली आहे. वर्ष २०१० मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतांना केवळ जातीद्वेषातून लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा रात्री दोन वाजता हटवण्यात आला. त्या वेळी शिवसेनेच्या आमदार डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांच्यासह शिवसैनिकांनी आंदोलन केले; मात्र ११ वर्षांनंतरही हा पुतळा तेथे बसवण्यात आलेला नाही. ३ जानेवारी २०१७ मध्ये संभाजी उद्यानात असलेल्या नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची तोडफोड करून तो हटवण्यात आला. हा प्रकारही ऐन मध्यरात्री घडला. या प्रकरणी पोलिसांनी काहींना अटक केली, साहित्य-नाट्य यांसह अन्य क्षेत्रांतील अनेक संस्थांनी याचा निषेध केला. इतकेच काय, तर यावर पंतप्रधान कार्यालयाने १९ जानेवारी २०१७ या दिवशी राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव यांना ‘याविषयी योग्य ती कार्यवाही करावी’, असा आदेश पत्राद्वारे दिला होता; मात्र त्यानंतरही पुणे महापालिकेने यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

ज्या पुण्याला विद्या-संस्कृतीचे माहेरघर समजले जाते, त्या पुण्यात सर्वपक्षीय शासनकर्ते, लोकप्रतिनिधी यांच्याकडून राष्ट्रपुरुष मात्र नेहमीच उपेक्षित राहिले आहेत. ही परिस्थिती पालटण्यासाठी आता राष्ट्रप्रेमी नागरिकांनीच पुढाकार घेऊन दबावगट निर्माण केला पाहिजे आणि सरकार अन् प्रशासन यांना योग्य ती कृती करण्यास भाग पाडले पाहिजे !

– श्री. अजय केळकर, सांगली