संभाजीनगर येथे बैलांच्या चोर्‍यांमुळे शेतकरी हवालदिल !

पोलीस साहाय्य करत नसल्याविषयी शेतकर्‍यांच्या तक्रारी !

  • शेतकर्‍यांच्या बैलजोड्या वारंवार चोरीला जात असतांना पोलीस झोपा काढत आहेत का ? – संपादक 
  • गेले काही वर्षे शेतकर्‍यांच्या गायी चोरीला जात होत्या; आता बैलही चोरीला जात आहेत. चोर कोण आहेत ?, हे पोलिसांना माहीत नसेल असे नाही. पोलिसांना ठोस कारवाईच करायची नाही, हे सत्य आहे ! – संपादक 
  • इतर देशांतील सरकार शेतकर्‍यांना सर्व सुविधा देऊन त्यांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण कार्यक्षमपणे केले जाते; मात्र दिवसरात्र कष्ट करणार्‍या येथील शेतकर्‍यांना पोलीस संरक्षण, तर सोडा, त्यांची साधी तक्रारही नोंदवून घेतली जात नाही. शेतकर्‍यांच्या मोर्च्यांना पाठिंबा देणारे पक्ष शेतकर्‍यांच्या या साध्या प्रश्नाकडेही का लक्ष देत नाही ? – संपादक  
प्रतिकात्मक छायाचित्र

संभाजीनगर – जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकर्‍यांना बैल चोरांच्या दहशतीमुळे रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. माळीवाडा-दौलताबाद या भागांमध्ये गेल्या ४ मासांत ३० बैलजोड्या म्हणजे ६० बैल चोरीला गेले आहेत. त्यामुळे आता शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बैल चोरीला गेल्याने गरीब शेतकर्‍याचे सर्वस्वच गेल्याप्रमाणे झाले आहे. रात्रीच्या वेळी धारदार शस्त्र हातात घेऊन टोळकी येतात. ही टोळकी गोठ्यातील जनावरे चोरून नेतात. बैलजोडीची चोरी होत असल्याने आता जनावरांचे रक्षण करण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतकर्‍यांच्या घरातील सदस्य आळीपाळीने जागे रहात आहेत.

‘रक्षण करणारे पोलीसच जर साथ देत नसतील, तर आमचे रक्षण कोण करणार ?’, असा प्रश्न शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे. ‘जनावरे गोठ्यात न बांधता घराजवळ बांधावी किंवा गोठ्याजवळ कोणीतरी रात्री झोपावे’, असा उपदेशही पोलिसांकडून करण्यात आला आहे. (चोरांना पकडण्याचे दायित्व आणि कर्तव्य पोलिसांचे असतांना उलट शेतकर्‍यांना असा उपदेश करणारे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावरच कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक) 

पोलीस शेतकर्‍यांच्या तक्रारीही नोंदवून घेत नाहीत !

कामचुकार पोलीस अन्वेषण करून बैलजोड्या शोधतील का ? असे निष्क्रीय आणि भ्रष्ट पोलीस जनतेचे भक्षकच ! – संपादक 

जनावरे चोरीला जात असल्याने शेतकर्‍यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलीस ठाण्यातील पोलिसांचा शेतकर्‍यांना प्रतिसाद मिळत नाही. पोलीस ठाण्यात जाताच तेथील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी शेतकर्‍यांना हाकलून देतात. पोलिसांकडून शेतकर्‍यांची कोणतीही तक्रार नोंदवून घेतली जात नाही. कोणत्याही पद्धतीचे अन्वेषण पोलीस करत नाहीत, तसेच इतक्या बैलजोड्यांची चोरी होऊनही पोलीस साधी गस्तही घालायला येत नाहीत, अशा तक्रारी शेतकर्‍यांनी केल्या आहेत.