देशी झाडांच्या ३ लाख बियांचे संकलन करून त्यांचे विनामूल्य वाटप करणारे लातूर जिल्ह्यातील शिवशंकर चापुले !

(उजवीकडे) श्री. शिवशंकर चापुले

लातूर – परिसरातील रानावनांत फिरून देशी झाडांच्या ३ लाख बियांचे संकलन करून वृक्षलागवड करू इच्छिणार्‍यांना विनामूल्य वाटप करणारे रेणापूर (जिल्हा लातूर) येथील श्री. शिवशंकर चापुले यांनी रहात्या घरामधील १ खोली केवळ बियाणे ठेवण्यासाठी दिली आहे. ‘निसर्गाकडे केवळ मौजमजा म्हणून पहाणार्‍या आणि फिरणार्‍या व्यक्तींनी स्वत:च्या नियोजनबद्ध कृतीतून वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करावा’, असे आवाहन शिवशंकर चापुले यांनी एका वृत्तपत्राच्या माध्यमातून केले आहे.

या वेळी चापुले म्हणाले की,

१. मी रविवारी सुटीच्या दिवशी सकाळपासूनच निसर्गाचे निरीक्षण करण्यासाठी शेतात जात असे. त्यातूनच लक्षात आले की, जागोजागी जाऊन रोप लावणे आणि ती जगवण्याएवढा वेळ प्रतिदिनच्या नोकरीमुळे देऊ शकत नाही. त्यामुळे मी वृक्ष लागवड करणार्‍यांना बियांचा पुरवठा करण्याचा निश्‍चय केला.

२. रोपवाटिकेतून कुठली तरी रोपे आणल्यास, त्यातील बरीचशी विदेशी रोपे असल्याने, ती लावल्यानंतर केवळ हिरवळ वाढते; मात्र वैविध्यता वाढत नाही.

३. अनेक वर्षांच्या वृक्षतोडीमुळे देशी झाडांची संख्या न्यून होत चालली आहे. रोपांची लागवड करतांना डोळसपणा हवा.

४. आपल्या भागातील भूमी आणि पाऊसमान कसे आहे ?, हे जाणून कोणत्या झाडांची लागवड केल्यास योग्य ठरील ?, हे लक्षात घेऊन त्यानुसार झाडांची निवड करायला हवी. त्यातूनही विविधता जपता येते.