उत्तरप्रदेशचे विधी आणि न्याय मंत्र्यांकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला ‘हलाल’ प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांवर कारवाई करण्यासाठी पत्र

हिंदु जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केली होती मागणी

उत्तरप्रदेश राज्याचे विधी अन् न्याय मंत्री ब्रजेश पाठक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीचे बिहार आणि उत्तरप्रदेश राज्य समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी उत्तरप्रदेश राज्याचे विधी अन् न्याय मंत्री ब्रजेश पाठक यांना ‘हलाल’ प्रमाणपत्र घेण्यास अवैधरित्या बंधनकारक करण्याचा प्रयत्न केला जात आहे’, हे निदर्शनास आणून दिले होते. या प्रकाराला आळा घालण्याची मागणी करणारे निवेदनही श्री. कुलकर्णी यांनी ब्रजेश पाठक यांना दिले होते. यावर पाठक यांनी अशा प्रकारचे प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांवर योग्य कारवाई करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र पाठवले आहे.

यात ब्रजेश पाठक यांनी लिहिले आहे, ‘‘सध्या मांस, तेल, मसाले, मिठाई, धान्य आदी खाद्यपदार्थांविषयी भारत सरकारची कोणतीही अनुमती नसतांना काही संस्था अवैधरित्या खासगी आस्थापनांना ‘हलाल’ प्रमाणपत्र देत आहेत. भारताच्या आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या ‘खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकारणा’कडून खाद्यपदार्थांच्या संदर्भात प्रमाणपत्र देण्यात येत असते. या कायद्याचे पालन करत श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी यांनी दिलेल्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी.’’