सोलापूरच्या विद्या कुलकर्णी यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संयुक्त संचालकपदी निवड !

आय.पी.एस्. अधिकारी विद्या कुलकर्णी

सोलापूर – मूळ सोलापूरच्या आणि सध्या तमिळनाडू येथील आय.पी.एस्. अधिकारी विद्या जयंत कुलकर्णी यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संयुक्त संचालकपदी निवड झाली आहे. विद्या कुलकर्णी या वर्ष १९९८ मधील तमिळनाडू केडरच्या आय.पी.एस्. अधिकारी आहेत. त्यांची पुढील ५ वर्षांसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संयुक्त संचालकपदी निवड झाली आहे.

विद्या कुलकर्णी यांचे प्राथमिक शिक्षण तिर्‍हे (तालुका उत्तर सोलापूर) येथे झाले, तर शालेय शिक्षण पंढरपूर येथील कवठेकर प्रशाला येथे झाले. पुढे त्यांचे अभियांत्रिकी शिक्षण सांगली येथील वालचंद महाविद्यालय येथे झाले. आय.पी.एस्. झाल्यानंतर तमिळनाडू केडरमध्ये विद्या कुलकर्णी यांनी विविध पदांवर काम केले. सध्या त्या तमिळनाडूच्या पोलीस महानिरीक्षक आहेत. यापूर्वी त्यांनी वर्ष २००९ ते वर्ष २०१४ या कालावधीत पुणे येथे केंद्रीय अन्वेषण विभागाचे काम पाहिले आहे.