|
|
कानपूर (उत्तरप्रदेश) – देशात ईशनिंदा कायदा करण्यात यावा. या कायद्यानुसार प्रेषित महंमद पैगंबर, तसेच इस्लाम धर्माच्या पवित्र गोष्टींचा अनादर करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय परिषदेत केली. याखेरीज ‘समान नागरी कायदा हा भारतासारख्या धार्मिक वैविध्य असलेल्या देशात योग्य आणि उपयोगी नाही. त्यामुळे मुसलमानांवर समान नागरी कायदा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लादू नये’, अशी विनंतीही बोर्डाकडून करण्यात आली आहे. या परिषदेत बोर्डाचे २०० सदस्य सहभागी झाले होते. यात विविध ठराव संमत करण्यात आले.
‘मोहम्मद साहब पर आपत्तिजनक टिप्पणियाँ… ईशनिंदा पर बने कानून’: मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड को यूनिफॉर्म सिविल कोड कबूल नहीं#MuslimPersonalLawBoard #BlasphemyLaw #UniformCivilCodehttps://t.co/koCNUOL72i
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 22, 2021
१. या परिषदेत मांडण्यात आलेल्या ठरावात नमूद करण्यात आले आहे की, काही हिंदू, शीख आणि मुसलमानेतर उच्चशिक्षित लोकांनी सातत्याने प्रेषित महंमद पैगंबर यांची महानता मान्य केली आहे. इस्लामच्या शिकवणीनुसार, मुसलमानांनीही इतर धर्मियांच्या पवित्र धार्मिक गोष्टींविषयी अपमानास्पद भाष्य करणे टाळायला हवे. काही लोकांनी प्रेषित महंमद पैगंबर यांचा उघडपणे अपमान केला; मात्र सरकारने त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही, हे खेदजनक आहे. धर्मांध शक्तींची अशी भूमिका अस्वीकारार्ह आहे.
२. गेल्या काही वर्षांपासून मुसलमानांच्या विरोधात विखारी प्रचार केला जात आहे. सामाजिक माध्यमांद्वारे मुसलमानांविषयी द्वेषपूर्ण लिखाण केले जात आहे. त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.