परमबीर सिंह देशातच असून त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यास ते ४८ घंट्यांत समोर येतील ! – परमबीर सिंह यांच्या अधिवक्त्यांचा न्यायालयात दावा

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह

नवी देहली – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह देशातच आहेत. ते पसार झालेले नाहीत. मुंबई पोलिसांकडून सिंह यांच्या जिवाला धोका आहे. त्यामुळेच ते समोर येत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यास ते पुढील ४८ घंट्यांत सीबीआयच्या कार्यालयात अथवा न्यायालयात उपस्थित होतील, असे सिंह यांच्या अधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला. ‘परमबीर सिंह यांनी तपासाला सहकार्य करावे’, असा आदेश न्यायालयाने दिला. मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ‘परमबीर सिंह नेमके कुठे आहेत ?’, असा प्रश्‍न सिंह यांच्या अधिवक्त्यांना विचारला होता. त्यावर अधिवक्त्यांनी वरील माहिती दिली.

सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्याची सिद्धता दर्शवत महाराष्ट्र सरकार आणि सीबीआय यांना नोटीसही बजावली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ डिसेंबरला होणार आहे.