श्रीकृष्णाच्या मूर्तीचा हात निखळल्याने पुजार्‍याने रुग्णालयात जाऊन मूर्तीवर करून घेतले उपचार !

आगरा (उत्तरप्रदेश) – भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचा हात निखळल्याने तो बसवण्यासाठी एक कृष्णभक्त पुजारी येथील जिल्हा रुग्णालयात रडत पोचला. त्याने आधुनिक वैद्यांना हात पुन्हा बसवून देण्याची विनंती केल्यावर त्यांनी पट्टी बांधून मूर्तीचा हात पुन्हा बसवून दिला. ‘सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीला स्नान घालत असतांना हात निखळला’, असे पुजारी लेखी सिंह याने आधुनिक वैद्यांना सांगितले. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. लेखी सिंह गेली ३० वर्षे अर्जुन नगरातील पथवारी मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत आहेत.


१. या घटनेविषयी लेखी सिंह म्हणाले की, मी रुग्णालयात जाऊन मूर्तीचा हात जोडून देण्याची, तसेच पट्टी बांधण्याची विनंती केली; मात्र कुणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. मी आतून कोलमडलो होतो. त्यामुळे अश्रू अनावर झाले.

२. जिल्हा रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक डॉ. अशोक कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, ‘मूर्तीवर उपचार करा’ असे म्हणत पुजारी रडत होता. पुजार्‍याच्या भावना पाहून आम्ही मूर्तीची ‘श्रीकृष्ण’ नावाने रुग्ण म्हणून नोंद केली. पुजार्‍याच्या समाधानासाठी आम्ही मूर्तीच्या हाताला पट्टी बांधली. (पुजार्‍याच्या समाधानासाठी कृती करण्यापेक्षा भाव ठेवून पट्टी बांधली असती, तर त्याचा आध्यात्मिक लाभ झाला असता ! – संपादक)