स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर यांचे लाभलेले मार्गदर्शन !

‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया अवघड अन् भीतीदायक आहे’, असे म्हणणे चुकीचे आहे. प्रत्यक्षात रामनाथी आश्रमात ही प्रक्रिया करून गेलेला कुणीही साधक ‘ती अवघड आहे’, असे सांगणार नाही; कारण ही प्रक्रिया केलेल्या जिवाला साधनेचा योग्य मार्ग मिळालेला असतो. मनाला सकारात्मक ठेवून आणि अडचणींवर मात करून प्रक्रिया राबवण्यासाठी रामनाथी आश्रमात आल्यावर ‘ही प्रक्रिया किती आनंददायी आहे’, हे अनुभवायला मिळेल.

सौ. सुप्रिया माथूर
श्री. संजय माने

१. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेत शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. जिवाचा उद्धार करणारी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ! : ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया म्हणजे आपल्यातील सुप्त गुणांना उजाळा देऊन जागृत करणे आणि आपल्या मनाप्रमाणे वागण्यापेक्षा ‘ईश्वरेच्छेने वागणे’, असे आहे.

इथे आढावा देतांना आपण ‘गुरुदेवांना आढावा देत आहोत’, असा भाव ठेवायचा असतो. सौ. सुप्रियाताई (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के असलेली आढावा घेणारी साधिका, सौ. सुप्रिया माथूर) आढावा घेत असलेल्या प्रत्येक सत्संगात गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवायला मिळते. सौ. ताई साधकांच्या मनाची स्थिती समजून घेतात आणि ‘त्या जिवाचा उद्धार व्हावा’, या दृष्टीने मार्गदर्शन करतात. आढाव्यातील सूत्रे ऐकतांना आपली भावजागृती होते आणि साधनेचे दृष्टीकोन अंतःकरणात रुजतात. ‘सौ. सुप्रियाताई ‘प्रतिमा जपणे आणि शिकण्याची वृत्ती अल्प असणे’, या पैलूंवर आढावा घेतात, तेव्हा शरिरावरील आवरण गळून गेल्याचे जाणवते.

१ आ. आढाव्यामध्ये साधकांना अंतर्मुख करणे : आढाव्यात सौ. सुप्रियाताई ‘सेवा करतांना नाम चालू असते का ? गुरूंचे स्मरण होते का ? स्वतःचे स्वभावदोष आणि अहं यांचे निरीक्षण होते का ? मनाचे चिंतन होते का ? उत्तरदायी साधकाकडून काही शिकतो का ? सेवा मिळाल्याविषयी कृतज्ञता वाटते का ?’ इत्यादी प्रश्न विचारून साधकांना अंतर्मुख करतात.

१ इ. मनमोकळेपणाने बोलण्याचे महत्त्व : सौ. ताई सांगतात, ‘मन हे वायूवेगाने धावते; म्हणून त्याला नामाचे चाक लावायचे, म्हणजे ते कितीही धावले, तरी ईश्वराकडेच जाईल. मनात येणारा प्रत्येक विचार मनमोकळेपणाने बोलून घ्या, नाहीतर तो साचत जातो आणि त्यामुळे स्वभावदोष अन् अहं यांची निर्मिती होते.’

१ ई. साधकांना त्यांच्या प्रकृतीप्रमाणे स्वीकारणे : समोरच्या साधकाला समजून घेणे महत्त्वाचे आहे, नाहीतर अपेक्षा निर्माण होऊन प्रतिक्रिया येऊ लागतात. इथे एकच लक्षात घ्यायचे की, व्यक्ती तिच्या प्रकृतीप्रमाणे वागत असते. त्यामुळे ‘ती जशी आहे, तसे तिला  स्वीकारणे’, ही साधना आहे. समोरची व्यक्ती कशीही वागली, तरी आपण स्थिर राहून ‘आपले कुठे चुकले ?’ ते पहायचे असते. आपल्या समोर आलेली प्रत्येक व्यक्ती म्हणजे आपल्याला ‘घडवायला आलेला ईश्वरच आहे’, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

१ उ. चुका स्वीकारण्याचे महत्त्व : चुका अंतर्मनापासून स्वीकाराव्यात. त्या चुकांची खंत वाटली पाहिजे.

१ ऊ. इतरांच्या अनेक गुणांचा अभ्यास करून शिकावे आणि देवाने दिलेली कार्यपद्धत पाळावी, म्हणजे अनेक जन्मांत झालेल्या संस्कारांना योग्य मार्ग मिळतो.

२. सौ. सुप्रिया माथूर यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन

२ अ. नकारात्मक विचारात गेलेल्या साधकाला कौशल्याने सकारात्मक बनवणे : एका साधकाला प्रक्रियेत येण्यास पुष्कळ भीती आणि काळजी वाटत होती. तो साधक आढाव्यात बसल्यावर सौ. सुप्रियाताईंनी त्याची नकारात्मक स्थिती जाणली आणि त्याला विचारले, ‘‘ही स्थिती कोणत्या कारणाने निर्माण झाली ?’, याचे चिंतन करून लिहून मला दाखवा.’’ त्यानंतर पहिल्याच आढाव्यात तो साधक पुष्कळ सकारात्मक होऊन त्याने त्याची स्थिती सर्वांसमोर सांगितली. त्या आढाव्यात त्याचा ताण पुष्कळ अल्प झाला. त्यानंतर दुसर्‍या आढाव्यात त्याने चिंतन आणि मनाच्या स्तरावर झालेल्या चुका वाचून दाखवल्या. तेव्हा त्या साधकाचे शरिरावरील आवरण गळून गेले आणि तोंडवळ्यावर आनंद जाणवू लागला.

२ आ. सौ. सुप्रियाताईंनी एका वयस्कर काकांना वडिलांप्रमाणे मानून मार्गदर्शन करणे : एक वयस्कर काका प्रत्येक आठवड्यात आढावा देण्यासाठी यायचे. काका व्यावहारिकदृष्ट्या पुष्कळ हुशार आहेत; परंतु त्यांना हे सर्व ‘साधना म्हणून करायचे आहे’, हे लक्षात येत नव्हते; कारण त्यांना अनेक वर्षांचा कामाचा अनुभव होता. त्यामुळे ते सहसाधक, उत्तरदायी साधक आणि कामगार या सर्वांनाच व्यावहारिक दृष्टीने हाताळायचे, तसेच ते कधी कधी रागवायचे अन् ओरडायचेसुद्धा. त्यांना ‘स्वतःला योग्य वाटते, तेच झाले पाहिजे’, असे वाटायचे. त्यांचे ‘मनाप्रमाणे करणे, कार्यपद्धती न पाळणे, स्वतःच्या मतावर ठाम असणे, कुणी काहीही योग्य सुचवले, तरी ते ऐकून न घेता ‘आपले तेच खरे मानणे’, असे अहंचे पैलू होते. त्यांना वाटायचे ‘माझी सेवा १० ते ११ घंटे होते. माझे सर्व सुरळीत चालू आहे.’ काकांनी आढावा देणे, म्हणजे त्यांच्या तीव्र अपेक्षा आणि तीव्र प्रतिक्रिया असायच्या, तरीही सुप्रियाताई ‘एखादी मुलगी तिच्या वडिलांना समजावून सांगत आहे’, अशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करायच्या.

सौ. सुप्रियाताईंनी त्यांना पुढील दृष्टीकोन दिले, ‘‘काका, तुम्ही १० ते ११ घंटे नियमित सेवा करता. तुमचा देह झिजवता; पण मनाला असेच मोकळे सोडून देता. त्यामुळे सर्व स्वभावदोष आणि अहं उफाळून येतात. तुम्ही जे सेवेतून कमवता, ते बोलण्यातून गमावता (व्यय करता), म्हणजे प्रतिदिन जी काही साधना करता, ती इथेच संपवता. काका, साधना संपवायची नसते, तर साठवून साठवून वाढवायची असते. तुम्ही प्रत्येक घंट्याला तुमच्या मनाचा आढावा घ्या. स्वतःचे चिंतन वाढवा. स्वतःच्या चुका स्वतः लहान होऊन इतरांना विचारा. तुम्ही तुमच्या बोलण्यातील चुकांसाठी क्षमायाचना करा आणि प्रायश्चित्त घ्या. प्रार्थना आणि कृतज्ञता वाढवा.’’

सौ. सुप्रियाताईंनी सांगितल्याप्रमाणे काकांनी आढावा देण्यास चालू केले. त्यामुळे आता त्यांच्या मनाची स्थिती चांगली झाली आहे. त्यांच्या बोलण्यात पालट जाणवतो. त्यांचे चिंतन वाढले आहे. त्यांना स्वतःच्या चुकांची खंत वाटल्यामुळे ते आता प्रत्येक कृती ‘साधना’ म्हणून करत आहेत.

२ इ. एका तरुण साधकाने स्वतःला एका चौकटीत अडकवून घेतल्यामुळे तो साधनेपासून दूर रहाणे : एक तरुण साधक पुष्कळ वर्षे साधनेत आहे. तो एकच सेवा करतो. त्यामुळे त्याने स्वतःला एका चौकटीत बांधून घेतले आहे. त्या चौकटीत तो स्वतःला आदर्श आणि परिपूर्ण समजतो. त्यामुळे त्याच्यात ‘इतरांना समजून न घेणे, इतरांना साहाय्य न करणे, इतरांचा विचार नसणे’, या दोषांचे प्रमाण कधी वाढले ? हे त्याच्या लक्षातही आले नाही.

त्याने सुप्रियाताईंना चिंतन लिहून दिले होते. सौ. सुप्रियाताईंचा आढावा चालू झाला. तेव्हा दादाला काहीच सुचत नव्हते. ताईंनी दादाला वरील स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव करून दिल्यावर तो पुष्कळ आनंदी होऊन त्याला स्वतःच्या चौकटीतून बाहेर आल्यासारखे जाणवले. नंतर तो आढाव्यात आनंदी असल्याचे जाणवत होते.

२ ई. प्रसारातील एका साधकाला प्रक्रियेपेक्षा प्रसारच महत्त्वाचा वाटत असल्याने त्याला केलेले मार्गदर्शन : प्रसार सेवेत असलेले एक साधक प्रक्रियेसाठी आले होते. प्रक्रियेच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न पुष्कळच अल्प होते. आढावा देण्यापुरतेच त्यांचे चिंतन असायचे. त्यांचे गांभीर्य वाढावे, यासाठी सौ. ताईंनी त्यांना पुढील मार्गदर्शन केले.

२ ई १. नियमित आढावा द्या ! : ‘‘तुमची स्वतःला पालटण्याची तळमळ पुष्कळच अल्प आहे. प्रसारात गेल्यावर सातत्याने उत्तरदायी साधकांचे साहाय्य घ्या आणि त्यांना नियमित आढावा द्या.

२ ई २. मनाला घडवा ! : आपण शरीर झिजवले, तर ते काही दिवसांनी थकते; पण मन मोक्षाला जाईपर्यंत कार्यरत असते. आता तुम्हाला मन घडवण्याची संधी मिळाली आहे. ती घालवायची नाही. आपण पूर्णवेळ सेवेत आहात, ते केवळ देह झिजवण्यासाठी नाही. तेव्हा मन घडवण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या मनाचे चिंतन वाढले की, मन स्वच्छ रहाते. नकारात्मकतेवर मात केली की, आपली सकारात्मकता वाढते.

२ ई ३. स्वभावदोष आणि अहं घालवण्यासाठी प्रयत्न करा ! : आपले वय वाढत जाण्याआधीच आपल्यातील स्वभावदोष आणि अहं घालवले पाहिजेत, नाहीतर आपले वय वाढेल, शरीर थकून जाईल आणि मन कार्यरत राहील. वय वाढल्यावर स्वतःला सुधारणे कठीण जाते.

२ ई ४. शिकलेले कृतीत आणा ! : रामनाथी आश्रमात आपण प्रक्रिया शिकायला येतो; पण येथून गेल्यावर कुठेही असलो, तरी ती कृतीत आणलीच पाहिजे. गुरु मनाला सतत आनंद आणि उत्साह देत असतात. तेव्हा आपण नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता वाढवणे आवश्यक असते. देवाच्या चरणी मन समर्पित झाल्यावर प्रत्येक सेवा परिपूर्ण होते. त्यामुळे ‘सत्यम् – शिवम् – सुंदरम्’, अशी साधना साध्य होते.’’

३. व्यष्टी आणि समष्टी साधनेतील समन्वय साधणे महत्त्वाचे !

सौ. सुप्रियाताई सांगतात, ‘व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधना महत्त्वाची आहे. असे असले, तरी समष्टी साधना एका निरांजनाप्रमाणे आहे. समष्टी साधना ही ज्योत असेल, तर त्यातील वात आणि तेल हे व्यष्टी साधना आहे. व्यष्टी साधनेचा पाया बसवला की, समष्टी साधना त्यावर आपोआप उभी रहाते. याचा अर्थ असा नाही की, ‘हे सर्व बंद करा आणि व्यष्टी साधनाच करा’, तर समष्टी साधना करतांना व्यष्टी साधनेच्या अंतर्गत मनाची स्थिती जाणून घ्या.’

४. गुरुदेवांप्रती कृतज्ञता

‘गुरुदेव, साधना कळल्यापासून मी तुमची ‘खरी शिकवण’ (मनाची साधना करणे, ही) विसरलो आणि पहिल्याच वर्गात राहिलो. तुम्ही सांगितलेली सेवा ‘कार्य’ म्हणून केले. त्यामुळे केवळ शरीर झिजले. ‘मन सेवेत अर्पण करून शरीर साधनेसाठी झिजवायचे आहे आणि उच्च प्रतीचे ध्येय गाठायचे आहे’, हे मी विसरून गेलो, म्हणजे खरेतर मी काही शिकलोच नाही.

‘गुरुदेव, तुमच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे; कारण तुम्ही ही प्रक्रिया आम्हाला अनेक वर्षांपासून शिकवत आहात. आम्हा सर्वांना करुणामय हृदयाने क्षमा करा.’

‘गुरुदेव, येणार्‍या भीषण आपत्काळापूर्वी तुम्ही सांगितलेली ही प्रक्रिया ‘आम्हा सर्व साधकांकडून प्रामाणिकपणे राबवून घ्या’, हीच आपल्या चरणी प्रार्थना करतो.’

– श्री. संजय माने, गडहिंग्लज, कोल्हापूर. (२४.२.२०१८)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक