अशी मागणी का करावी लागते ? साहाय्यक आयुक्तांवर अगोदरच कारवाई का केली नाही ? – संपादक
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरात, दिलेल्या सूचनांचे पालन करत भक्तीभावाने छटपूजेचा उत्सव पार पडला; परंतु पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात आयुक्त राजेश पाटील आणि त्यांच्या सहकारी अतिरिक्त आयुक्त, साहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, तसेच पोलीस-प्रशासन यांचा एकमेकांशी योग्य समन्वय नसल्यामुळे साहाय्यक आयुक्त आण्णा बोदाडे यांनी मोशी येथील इंद्रायणी घाटावर होणार्या छठपूजेत जाणूनबुजून अडथळा आणला. त्यामुळे अनेक भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपल्याच वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करत छटपुजेत व्यत्यय आणणार्या साहाय्यक आयुक्त आण्णा बोदाडे आणि संबंधित अधिकार्यांची या घटनेविषयी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विश्व श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे १५ नोव्हेंबर या दिवशी लेखी पत्र देऊन केली आहे.
आयुक्त पाटील यांना दिलेल्या पत्रात मांडण्यात आलेली सूत्रे
१. शहरातील १७ घाटांवर छटपूजा उत्सव साजरा करण्यासाठी विश्व श्रीराम सेनेने अनुमती मागितली होती. आयुक्त पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय आणि उपायुक्त संदीप खोत यांची समिती नेमून छटपूजा उत्सवासाठी आवश्यक त्या सेवासुविधा देण्याचे आदेश दिले होते; मात्र आयुक्त पाटील यांचे आदेश धाब्यावर बसवून या अधिकार्यांनी साहाय्यक आयुक्त आण्णा बोदाडे यांच्यावर दायित्व ढकलून कर्तव्य पार पाडले नाही.
२. तसेच बोदाडे यांनी छटपूजा महोत्सवाच्या मुख्य पूजेच्या दिवशी म्हणजेच १० नोव्हेंबरला मोशी येथील इंद्रायणी घाटावर येऊन छटपूजेत सहभागी होणार्या उत्तर भारतीय बंधू–भगिनींना पोलीस बळाचा वापर करून अपमानीत करून पुन्हा घरी पाठवले. या वेळी आयुक्त राजेश पाटील यांनी छटपूजेसाठी अनुमती दिली असल्याचे लालबाबू गुप्ता आणि त्यांच्या सहकार्यांनी बोदाडे यांना सांगितले. त्यानंतरही बोदाडे यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात छटपूजेस अनुमती नसल्याचे पत्र आयोजकांना दिले. आयुक्तांनी अनुमती दिली असतांना पूजेच्या २ घंटे अगोदर ऐन वेळी इंद्रायणी घाटावर येऊन पोलीस बळाचा वापर करून भाविकांच्या भावना दुखावण्याचे काम बोदाडे यांनी का केले ?
३. बोदाडे यांनी त्यांच्याच कार्यक्षेत्रात इतर घाटांवर त्याच वेळी सहस्रो भाविक एकत्र येऊन छटपूजा उत्सव साजरा करतात याकडे दुर्लक्ष का केले ? तसेच शहरातील इतर घाटांवरही छटपूजा उत्सव चालू असतांना केवळ विश्व श्रीराम सेनेच्या वतीने चालू असणार्या इंद्रायणी घाटावरील उत्सवात अडथळा आणण्यामागे आण्णा बोदाडे यांचा काय हेतू होता ? असाही प्रश्न उपस्थित होतो.