एस्.टी. कर्मचार्यांच्या संपाच्या परिणाम !
संभाजीनगर – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठी १९ नोव्हेंबर या दिवशी राज्यात परीक्षा पार पडली. एकूण ७२० पदांसाठी राज्यभरातून १ लाख २० सहस्र उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी संभाजीनगर जिल्ह्यातील ८० केंद्रांवर २१ सहस्र उमेदवारांची सोय करण्यात आली होती; मात्र एस्.टी. कर्मचार्यांचा संप असल्याने निम्म्यापेक्षाही अल्प उमेदवार उपस्थित राहू शकले. अनेक उमेदवारांनी परीक्षा केंद्र पालटल्याचे ‘ई-मेल’ न पडताळल्याने किंवा केंद्राच्या नावातील साधर्म्यामुळे काही जणांची धावपळ झाली; मात्र पोलिसांनी तात्काळ केंद्र पालटलेल्या ठिकाणी उमेदवारांना वाहनातून पोचवण्याची सोय केली.
‘मास्क’मध्ये चिप ठेवून कॉपी !
पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठीही कॉपी केली जाणे हे लज्जास्पद ! – संपादक
करमाड येथील न्यू हायस्कूल केंद्र येथे एका उमेदवाराने कानात ज्वारीच्या दाण्याएवढे ‘ब्ल्यूटूथ’ बसवून ‘मास्क’मध्ये चिप लपवली होती. पडताळणीत पोलिसांनी त्याला ‘मास्क’ काढायला लावला, तेव्हा त्यात चिप आढळली. करण सुंदरडे या विद्यार्थ्याच्या जागेवर डमी परीक्षा देणारा हा उमेदवार आकाश जारवाल होता. करण आणि आकाश यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘ब्ल्यूटूथ’ न निघाल्याने एका आधुनिक वैद्याकडे नेऊन त्याच्या कानातील चिप काढावी लागली.