सेवाभावी वृत्ती असलेले आणि साधकांना आधार देणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील श्री. शिरीष शहा !

श्री. शिरीष शहा

१. इतरांचा विचार करणे

‘श्री. शहाकाका पुणे शहरातील अनेक वयस्कर साधक, वाचक आदींना सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ घरी नेऊन देतात. कधी कधी काही साधक अकस्मात मागणी करतात, तरी ते ती पूर्ण करतात. ‘कुणाकडून तरी अकस्मात मागणी येऊ शकते’, हे गृहित धरूनच काकांनी अधिक मागणी केलेली असते.

२. अचूकता

धर्मरथासाठी आवश्यक असलेली उत्पादने आणि ग्रंथ यांचा साठा पुष्कळ मोठा असतो. काका सर्व साठा अतिशय व्यवस्थित रितीने काढून तो वेगवेगळा ठेवतात. त्यामागे ‘दुसर्‍या साधकाला तो सहज मोजता येईल’, असा त्यांचा विचार असतो. त्यांनी काढलेल्या साठ्यात कधीच चूक होत नाही.

३. सेवाभाव

काका सर्व साधकांशी अतिशय प्रेमाने बोलतात. त्यांना कोणत्याही सेवेसाठी कधीही भ्रमणभाष केला, तरी ते नेहमी ‘हो करतो’, असे म्हणतात. त्यांच्याकडे काही तातडीची सेवा चालू असेल, तर ते तशी कल्पना देतात; पण सेवेसाठी ते कधीही ‘नाही’, असे म्हणत नाहीत.

४. आधार वाटणे

साधकांच्या घरात आनंदाचा प्रसंग असो कि दुःखाचा प्रसंग असो, काका तिथे प्रथम पोचलेले असतात. त्यामुळे साधकही हक्काने त्यांना संपर्क करतात. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे कधी कधी वेळेत येत नाहीत किंवा अन्य कोणत्या तरी जिल्ह्यांचे गठ्ठे हरवतात, तेव्हा ‘तो गठ्ठा आपल्याकडे आला आहे का ?’, असे ‘रेल्वेस्थानका’वर जाऊन पहावे लागते. काका ही सेवा तातडीने करतात. अडचणीच्या वेळेस त्यांना सांगितले की, ती सेवा पूर्ण होते. त्यामुळे साधकांना काकांचा पुष्कळच आधार वाटतो.’

– सौ. शारदा हुमनाबादकर, पुणे (३.७.२०२०)