१. प्रेमभाव
१ अ. कुटुंबियांशी प्रेमाने वागणे : ‘प्रेमभाव हा सौ. मंजिरीचा स्थायीभाव आहे. ती कुटुंबीय, लहान मुले आणि साधक यांच्यावर पुष्कळ प्रेम करते. घरातील कुणी आजारी असेल, तर ती त्यांची पुष्कळ काळजी घेते. ती तिच्या सेवेतून वेळ काढून उत्तम स्वयंपाक बनवते. घरातील प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ बनवायची तिची केव्हाही सिद्धता असते. ती घरातील आम्हा सर्वांचे म्हणजे आई, भाऊ, मी आणि मुले यांचे व्यवस्थित अन् प्रेमाने करते.
१ आ. नातेवाइकांना आधार वाटणे : आजही काही नातेवाइकांना कौटुंबिक अडचण असेल, तर त्यांना मंजिरीचा आधार वाटतो. कोणत्या व्यक्तीला कशा पद्धतीने हाताळले पाहिजे, हे मंजिरीला उत्तम जमते. त्यामुळे ते नेहमी मंजिरीचा समुपदेश (सल्ला) घेतात. आमच्याकडे माझ्या मामेबहिणी शिक्षणासाठी आल्या होत्या. मंजिरीने त्यांना आणि त्यांच्या मैत्रिणींनाही पुष्कळ प्रेम दिले.
१ इ. सर्वांशी जवळीक साधणे : वर्ष २०१३ पर्यंत आम्ही पिंपरी, पुणे येथे होतो आणि त्यानंतर आम्ही नोकरीनिमित्त सातार्याला गेलो. मंजिरीने सर्व साधकांना ‘आध्यात्मिक कुटुंब’ म्हणून जोडले होते. ती सातार्यामध्ये सेवा करतांनाही तिची सर्वांशी जवळीक होती. सर्व साधकांना मंजिरी अतिशय प्रेमाने स्वतःच्या कुटुंबियांप्रमाणेच हाताळते. तिचे सर्व साधकांशी अल्पावधीतच एक वेगळेच नाते निर्माण होते. त्यामुळेच साधक आपल्या अडचणी मंजिरीला सांगतात आणि तीही त्यांना साधनेचे योग्य दृष्टीकोन देते.
२. साधनेची तळमळ
विवाहापूर्वीच ‘सनातन संस्थे’च्या मार्गदर्शनानुसार साधना करत असल्याने विवाहानंतर सेवेला वेळ देणार असल्याचे सांगून साधनेला प्राधान्य देणे : वर्ष २००६ मध्ये आमचा विवाह ठरला. त्या वेळी प्रथमच माझ्याशी बोलतांना तिने मला सांगितले होते, ‘‘मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करते. त्यामुळे विवाहानंतर मला सेवेसाठी वेळ द्यावा लागेल, तसेच मी मांसाहार बनवू शकत नाही. ही सूत्रे तुम्हाला मान्य असतील, तरच तुम्ही मला होकार द्या.’’ विवाहानंतर काही दिवसांनी तिने सेवेसाठी बाहेर जाण्यावरून आमच्यामध्ये पहिल्यांदा वाद झाला. तेव्हा तिने सांगितले, ‘‘माझे पहिले प्राधान्य नेहमीच साधना असेल.’’
३. परेच्छेने वागणे
ती घरातील प्रत्येक कृती आईला विचारून तिच्या आणि इतरांच्या इच्छेने करत असते. ती मला माझे वेतनही आईकडे द्यायला सांगायची. कितीतरी वर्षे माझ्या आईने तिच्यासाठी आणलेले कपडेही ती आनंदाने वापरत असे.
४. अन्यायाविरुद्ध चीड आणि स्पष्टवक्तेपणा
माझ्या भावाला नोकरीनिमित्त त्यांचा संघनेता (टीम लिडर) वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये पाठवायचा. एकदा त्याने भावाला जराही आराम मिळू न देता सलग वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले. तो आल्यानंतर पुष्कळ थकलेला होता. त्याच्या आस्थापनाचे वागणे पुष्कळ अन्यायकारक होते; पण सर्वजण सहन करतात. त्यामुळे माझा भाऊही काहीच बोलला नाही; परंतु मंजिरीने त्याच्या ‘टीम लिडर’ला दूरभाष करून त्याला त्याच्या अयोग्य कृतीची परखडपणे जाणीव करून दिली. काही चुकीचे होत असेल, तर मंजिरी ते स्पष्टपणे सांगायला घाबरत नाही.
५. मुलीवर (कु. शर्वणीवर) चांगले संस्कार करणे
नोकरीमुळे मला मुलीला हवा तेवढा वेळ द्यायला जमत नव्हता, तरी तिने कधी तक्रार केली नाही. एकत्र कुटुंबात राहूनही तिने मुलीवर (शर्वणीवर) चांगले आणि साधनेचे संस्कार केले आहेत.
६. पतीला व्यवसायात साहाय्य करणे
६ अ. नोकरीचे त्यागपत्र दिल्यावर व्यवसाय चालू करण्यासाठी साहाय्य करणे : मी नोकरी करत असतांना मला २ ते ३ वेळा पुष्कळ मानसिक त्रास झाला होता. त्या वेळी ‘मला नोकरी सोडायची आहे’, असे मी म्हटल्यावर तिने मला ‘तुम्हाला त्रास होत असेल, तर सोडा. आमची काहीच हरकत नाही’, असे शांतपणे सांगितले. वर्ष २०१७ मध्ये काही कारणास्तव मी नोकरीचे त्यागपत्र दिले. त्या वेळी तिनेच मला आधार दिला. सेवेला अधिक वेळ देता यावा; म्हणून तिनेच मला व्यवसाय करण्यास सुचवले. त्यासाठी तिने तिचे सर्व दागिने विकायला दिले.
६ आ. व्यवसायात साहाय्य लागल्यास अभ्यास करून योग्य पर्याय सांगणे : व्यवसाय चालू केल्यावरही मला व्यावहारिकदृष्ट्या काही साहाय्य किंवा समुपदेश लागल्यास परिस्थितीचा अभ्यास करून तीच मला योग्य समुपदेश द्यायची आणि प्रत्येक वेळी तिने दिलेले किंवा सुचवलेले पर्याय योग्य असायचे.
७. पतीला साधना सांगून अयोग्य सवयींपासून परावृत्त करणे
७ अ. पतीला योग्य सवयी लागण्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रयत्न करणे : मला आरंभीपासूनच वाईट सवयी लागलेल्या होत्या. मित्रांच्या समवेत मद्यप्राशन करणे, मांसाहार करणे, सिगारेट ओढणे अशा सर्व वाईट सवयींनी माझे आयुष्य व्यापून टाकले होते; परंतु मंजिरीने कधी माझ्याशी त्यासाठी भांडणे केली नाहीत. माझ्या वाईट सवयी जाण्यासाठी ती मला टप्प्याटप्प्याने सांगत होती. प्रथम सिगारेट, मग मद्य आणि त्यानंतर माझी मांसाहाराचीही सवय तिने मोडली. अशा प्रकारे तिने माझ्या सर्व वाईट सवयी एकदम बंद न करता कलाकलाने सोडवल्या. याविषयी मी सदैव कृतज्ञ आहे.
७ आ. मांसाहार करण्याची इच्छा नष्ट होऊन पूर्णपणे शाकाहारी होणे : माझ्या इतर सर्व सवयी बंद झाल्या होत्या; परंतु मांसाहार करणे सुटत नव्हते. मंजिरी मांसाहार बनवायची नाही; परंतु एक दिवस तिने मला इच्छा झाली असतांना घरी मांसाहार बनवण्यास साहाय्य केले. त्यानंतर माझी मांसाहार करण्याची इच्छा आपोआप अल्प होत गेली आणि आता मी पूर्णपणे शाकाहारी झालो आहे.
७ इ. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचनाची आवड निर्माण करणे : आरंभी मी पूर्ण दैनिक ‘सनातन प्रभात’वाचावे, असा तिचा आग्रह नसायचा. प्रत्येक वेळी जे उपयुक्त असेल, तेवढेच लेख किंवा एखादी सूचना किंवा लेखातील एखादा छोटासा परिच्छेद ती मला वाचायला द्यायची. त्यातून हळूहळू मला दैनिक वाचनाची आवड निर्माण झाली. मी ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचण्यासाठी वेळ नाही’, असे कारण सांगायचो. ‘तेव्हा ती ‘सात्त्विक आहार’ या लेखातील एखादाच परिच्छेद वाचा’, असे सांगायची आणि त्याचे परिणाम समजावून सांगायची. ज्या साधकांनी किंवा समाजातील व्यक्तींनी या सवयी बंद केलेल्या असतील, त्यांच्याशी ती माझी भेट घालून द्यायची.
८. पत्नीच्या प्रयत्नांमुळे पूर्ण वेळ साधना करण्याचा निर्णय घेणे
तिने माझ्यात साधनेची आवडही निर्माण केली. आज तिच्या प्रयत्नांमुळे मी पूर्ण वेळ साधना करण्याचा विचार करू शकलो. तिची गुरुदेवांवर असलेली श्रद्धा आणि साधना यांमुळेच आम्हाला दोन दैवी बालकांचे (पार्थ (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि शर्वणी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)) पालन-पोषण करण्याचे दायित्व मिळाले.
९. नातेवाइकांना साधना सांगून त्यांना आधार देणे
९ अ. नातेवाइकांना शास्त्र सांगितल्याने ते प्रतिदिन मनोभावे पूजा करणे : माझा एक नातेवाईक आधी देव मानत नव्हता; पण आता कधी त्याला अडचण आली की, तो श्रीगणेशाला प्रार्थना करतो. हेही मंजिरीनेच त्याला शिकवले. माझी आई पूर्वी केवळ सोपस्कार म्हणून पूजा-अर्चा करायची. मंजिरीने तिला शास्त्र सांगितल्यावर ती आता शास्त्रानुसार मनोभावे पूजा करते.
९ आ. माझे कर्मकांड करणारे काही नातेवाईक आता काही प्रमाणात दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेख वाचणे, लघुग्रंथ वाचणे आणि त्यानुसार शास्त्रोक्त पद्धतीने कृती करणे या टप्प्याला पोचले आहेत.
१०. साधनेमुळे मंजिरीचे व्यावहारिक दृष्टीकोनही परिपूर्ण असल्याने तिचा सर्वांनाच आधार वाटणे
‘कोरोना’ चालू झाल्यानंतर ती सर्वांकडून सर्व उपाययोजना करवून घेते. ती सर्वांकडून मंत्रजप करून घेणे, बाहेरून आणलेल्या वस्तूंची योग्य काळजी घेणे हे सर्व रामनाथी आश्रमात ज्या पद्धतीने केले जाते, तसेच करते.
११. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे घरातील आणि सहवासात येणार्या व्यक्तींना तिने साधनेकडे वळवले आहे.
१२. कुटुंबियांना आध्यात्मिक स्तरावर हाताळणे
आमची मुले चि. पार्थ आणि शर्वणी भांडले, रुसले किंवा मी कधी त्यांना रागावलो, तर मंजिरी आम्हाला आध्यात्मिक स्तरावर हाताळते अन् आनंदी करते. ती घरातील वातावरण चांगले ठेवते. सर्व कुटुंबाने साधनेमध्ये प्रगती करावी, यासाठी तिची पुष्कळ धडपड असते. ती कुणाच्याही हातून काही चूक घडली, तर ती व्यवस्थितपणे सांगून त्यासाठी स्वयंसूचना आणि कृतीच्या स्तरावर उपाययोजना सांगते.
१३. मुलेही आश्रमामधील नियमांचे परिपूर्ण पालन करून कुणालाही त्रास होऊ न देता आश्रमजीवन जगत असणे
तिच्या प्रयत्नांमुळेच आम्ही स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रियेसाठी रामनाथी आश्रमात आलो. तेव्हा आमची दोन्ही मुले ‘जणू पहिल्यापासूनच आश्रमात रहात आहेत’, या पद्धतीने सध्या रहात आहेत. त्यांनी आम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ दिला नाही. ती दोघेही आश्रमामधील नियमांचे परिपूर्ण पालन करून कुणालाही त्रास होऊ न देता आश्रमजीवन जगत आहेत.
१४. समष्टीचा विचार करणे
मंजिरीविषयी लिहायला घेतले, तेव्हा ती म्हणाली, ‘‘परम पूज्यांप्रती कृतज्ञता म्हणून लिहा आणि असे प्रसंग लिहा की, त्यातून इतर साधकांना साधनेत साहाय्य होईल. माझे कौतुक म्हणून लिहू नका.’’
मंजिरीविषयी लिखाण करतांना मला पुष्कळ कृतज्ञता जाणवत आहे. आज मी जिथे आहे, त्याचे संपूर्ण श्रेय मंजिरीला आहे. आज तिच्याच प्रयत्नांमुळे मी साधनेत आलो आणि गुरुदेवांचे आशीर्वाद मला मिळाले. त्यासाठी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. मिलिंद चव्हाण, फोंडा, गोवा. (नोव्हेंबर २०२०)