‘पूर्वी माझा स्वभाव पुष्कळ भावनाशील होता. मी लगेच अस्थिर होत असे. मला प्रसंगांचा लगेच ताण यायचा. एप्रिल २०२० मध्ये माझ्या यजमानांना अकस्मात् अर्धांगवायूचा झटका येऊन त्यांची वाचा गेली. (त्यांना बोलायलासुद्धा जमत नव्हते.) हे सर्व अनपेक्षित होते, तसेच ते ‘कोरोना’च्या कालावधीत घडले. त्या वेळी माझ्यासह घरातील कुणीही मोठी व्यक्ती नव्हती. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकण्यासाठी रामनाथी आश्रमात गेले नसते, तर निश्चितच मला ही परिस्थिती स्वीकारता आली नसती. ‘या कठीण प्रसंगात मला खंबीर, स्थिर आणि आनंदी रहाता येणे, तसेच परिस्थिती स्वीकारता येणे’, हे केवळ गुरुकृपेमुळेच शक्य झाले. ‘देवाचे नियोजन किती सुंदर असते !’, हे नंतर माझ्या लक्षात आले. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेविषयी मला शिकायला मिळालेली काही सूत्रे आणि स्वतःत पालट होण्यासाठी माझ्याकडून झालेले प्रयत्न पुढे दिले आहेत.
१. सौ. सुप्रिया माथूर यांनी आश्रमात शिकलेली स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया घरी गेल्यावर किंवा सेवा करतांना कृतीत आणण्याचे महत्त्व मनावर बिंबवणे
मी डिसेंबर २०१९ आणि जानेवारी २०२० हे दोन मास स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकण्यासाठी रामनाथी आश्रमात गेले होते. तेथे सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घ्यायच्या. ‘इथे प्रक्रियेचा केवळ सराव घेतला आहे. इथे जे काही शिकायला मिळाले आहे, ते घरी गेल्यावर किंवा सेवा करतांना तुला कृतीत आणायचे आहे’, हे त्यांनी माझ्या मनावर बिंबवले होते.
२. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना केलेले प्रयत्न अन् स्वतःमध्ये जाणवलेले पालट
२ अ. मनाचे निरीक्षण करणे जमू लागणे : पूर्वी ‘मनात विचार चालू आहेत’, हे माझ्या लक्षात येत होते; पण ‘मनात काय विचार चालू आहेत ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. प्रक्रिया शिकत असतांना प्रत्येक अर्ध्या घंट्याने मनाचा आढावा घ्यायचा असल्याने मला माझ्या मनाचे निरीक्षण करणे जमू लागले. प्रत्येक एका घंट्याने स्वयंसूचनांचे सत्र करण्यापूर्वी मला माझ्या मनातील विचार थोडक्यात लिहायची सवय लागली.
२ आ. विचारून कृती करण्याची सवय लागणे : प्रक्रिया शिकत असतांना सेवेत प्रत्येक गोष्ट दायित्व असणार्या साधकांना विचारूनच करायची असायची, उदा. बटाटा जरी चिरायचा असला, तरी ‘बटाट्याच्या फोडीचा आकार किती ठेवायचा ?’, ही लहान गोष्टसुद्धा विचारूनच करायची असल्याने मला विचारून कृती करण्याची सवय लागली.
२ इ. प्रांजळपणा वाढणे : ‘मनाचे निरीक्षण करणे आणि विचारून कृती करणे’, यांमुळे यजमानांच्या आजारपणाचा कठीण प्रसंग घडल्यावर ‘माझ्या मनात येणारे विचार, अडचणी आणि ‘प्रयत्न केले किंवा केले नाहीत’, हे सर्व संत अन् सहसाधक यांना प्रांजळपणे सांगून ते सांगतील तशी कृती करण्याचे प्रयत्न माझ्याकडून होत होते.
२ ई. ‘भावनाशीलता’ या स्वभावदोषावर मात करता येणे : भावाच्या स्तरावर ‘परात्पर गुरु सतत समवेत आहेत’, असे वाटत असल्याने आणि संतांनी सांगितलेले प्रयत्न केल्यामुळे मला माझ्यातील ‘भावनाशीलता’ या स्वभावदोषावर मात करण्यास जमू लागले.
२ उ. पूर्वीचे सुदृढ असलेले यजमान आणि त्यांच्या संदर्भातील सर्व भूतकाळ आता जणू गुरुमाऊलींनी पुसून टाकल्याने तो विचार माझ्या मनात येत नाही.
२ ऊ. ‘घर हा आश्रम आहे’, असे वाटणे : पूर्वी माझ्याकडून घर आणि आश्रम यांमध्ये भेद केला जायचा. मला आश्रमाची ओढ अधिक असायची. मला पाच मिनिटे जरी घरी अधिक वेळ द्यावा लागला, तरी मी अस्थिर होत असे. देवाने घरी राहून यजमानांची सेवा हीच माझी साधना म्हणून दिल्याने ती मला आनंदाने आणि मनापासून करता आली. त्यामुळे घर आणि आश्रम यांमध्ये भेद राहिला नाही.
२ ए. सेवा परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होणे : मला रुग्णसेवेचा काहीच अनुभव नसल्याने यजमानांची सेवा करतांना माझ्याकडून चुका झाल्यावर सेवेला अधिक वेळ लागायचा. ‘दुसर्या दिवशी ती चूक पुन्हा होऊ नये’, यासाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ लागले, तसेच ‘वेळ कसा वाचवू शकतो ?’, याविषयीचा अभ्यास मला करता येऊ लागला.
२ ऐ. पूर्वीची मनाची स्थिती – मनातील संकोचामुळे खोलीतील विजेचा दिवा (‘बल्ब’) निकामी झाला असल्याचे संबंधित साधकाला सांगण्यासाठी २ दिवसांचा अवधी लागणे : पूर्वी माझ्या मनामध्ये पुष्कळ संकोच असायचा. प्रक्रियेच्या वेळी ‘मी रामनाथी आश्रमातील ज्या खोलीत रहात होते, तेथील विजेचा दिवा (‘बल्ब’) निकामी झाला आहे’, हे संबंधित साधकाला सांगण्यासाठी मी दोन दिवस घालवले. त्यावर मी पुढीलप्रमाणे विचार केला, ‘अडचण विचारल्याविना उपाय मिळणार नाही. समोरची व्यक्ती ‘हो’ किंवा ‘नाही’ म्हणेल. ते स्वीकारून स्वतः अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, तसेच संघर्ष करण्यात वेळ आणि शक्ती वाया घालवण्यापेक्षा विचारून मोकळे व्हायला हवे.’
२ ऐ १. झालेला पालट – भाडेकरू भाडे देण्यासाठी टाळत असतांना त्याच्याविरुद्ध कारवाई करणे आणि त्यामुळे भाडेकरूने खोली रिकामी करणे : यजमान रुग्णाईत असतांना भाडेकरूने खोलीचे भाडे दिले नव्हते. एप्रिल २०२० ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत यजमानांच्या मेंदूची तीन शस्त्रकर्मे झाली आणि नंतर ‘कोरोना’चे प्रमाण न्यून झाल्यावर त्यांना उपचारांसाठी पनवेलच्या बाहेर घेऊन गेल्याने या सर्व धावपळीमध्ये मी त्या भाडेकरूला संपर्क केला नव्हता. जानेवारी २०२१ मध्ये ‘तुम्हाला भाडे द्यायला जमत नाही, तर खोली रिकामी करा’, असे सांगूनसुद्धा भाडेकरू ऐकत नव्हता. ‘कोरोना’च्या कालावधीतील दुसर्या दळणवळण बंदीच्या कालावधीत आम्ही घरीच असल्याने त्यांना ३१ मेपर्यंत खोली रिकामी करण्यास सांगितले. ‘थकलेले भाडे देण्यासाठी तुम्ही खोलीवर येऊन भाडे घेऊन जा’, असे त्या व्यक्तीने आम्हाला सांगितले. ती व्यक्ती ‘मी यजमानांना एकटे सोडून जाऊ शकत नाही’, याचा अपलाभ घेऊ लागली. तेव्हा ‘या सर्व प्रकाराबद्दल पोलीस तक्रार करत आहे’, याची पूर्वकल्पना देण्याविषयीचे लिखित स्वरूपातील निवेदन वसाहतीमध्ये (‘सोसायटी’मध्ये) द्यायला हवे’, हे देवानेच मला सुचवले. ते निवेदन वसाहतीचे अध्यक्ष आणि सचिव यांना ‘व्हॉट्सॲप’वर पाठवल्यावर त्या व्यक्तीने खोली रिकामी केली आणि भाडेसुद्धा दिले. पूर्वीचा माझा स्वभाव आणि आता त्यात झालेला पालट हा केवळ स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया कृतीत आणल्यामुळे, तसेच गुरुमाऊलींच्या कृपेमुळेच झाला आहे.
३. यजमानांचे मनोबल वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न
३ अ. प.पू. गुरुदेव समवेत असल्याचे सांगितल्याने यजमानांचे मनोबल वाढणे : यजमान आरंभी पुष्कळ निराश झाल्याने बर्याच वेळा रडायचे; पण त्या वेळी त्यांना ‘प.पू. गुरुदेव तुमच्या समवेत आहेत’, असे बोलून आधार दिल्याने आणि त्यांच्याकडून भावजागृतीचे प्रयोग करवून घेतल्याने त्यांचे मनोबल हळूहळू वाढत गेले.
३ आ. यजमानांना स्वतःहून एखादे वाक्य बोलता येत नसूनही स्वयंसूचना सत्रातील ८ शब्दांचे वाक्य शिकवल्यावर गुरुकृपेने त्यांना ते बोलता येणे : मी त्यांच्यासाठीचे स्वयंसूचनांचे सत्र एक एक शब्द त्यांना म्हणण्यास सांगून त्यांच्याकडून करवून घेत असे. गुरुकृपेमुळे एका मासाच्या आतच त्यांनी स्वतःची स्थिती स्वीकारली. आता त्यांना स्वतःहून एखादे वाक्य बोलता येत नाही. त्यांच्या तेवढे लक्षात रहात नाही; पण ‘स्वयंसूचना सत्रातील ८ शब्दांचे वाक्य शिकवल्यावर ते स्वतःहून ते वाक्य बोलू शकतात’, हीसुद्धा गुरुकृपाच आहे.
४. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘हे गुरुमाऊली, ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया हा तुमचा संकल्प असल्याने मला प्रक्रिया शिकता आली अन् तिचा लाभ करून घेता आला’, ही केवळ आणि केवळ तुमचीच कृपा आहे. ‘हे सर्व प्रयत्न तुम्हीच आमच्याकडून करवून घेतलेत. या परिस्थितीमध्ये तुम्हीच आम्हाला शिकण्याच्या स्थितीत ठेवले. हे सर्व लिखाण आपणच लिहून घेतले’, याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. समिधा संजय पालशेतकर, देवद, पनवेल. (१६.६.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |