लैंगिक भावनेतून केलेला कुठलाही स्पर्श, हे लैंगिक शोषणच ! – सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – निर्वस्त्र न करता स्तनांना स्पर्श करणे, म्हणजे लैंगिक अत्याचार नव्हे’, असा निकाल काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने एका बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणात दिला होता. तथापि लैंगिक उद्देशाने केलेला कुठलाही स्पर्श, हे लैंगिक शोषणच आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणातील आरोपीला पुन्हा ‘पॉक्सो’ कायद्याच्या कलमांच्याच अंतर्गत दोषी ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, स्पर्श कपड्यांवरून आहे कि ‘स्कीन टू स्कीन’ (शरिराचा शरिराला थेट स्पर्श होणे) यावरून खल करत बसलो, तर पॉक्सो कायद्याचा उद्देशच बाजूला पडेल.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिलेल्या निकालात म्हटले होते, ‘एखाद्या लहान मुलीचा हात पकडणे किंवा पॅण्टची चेन उघडणे, ही गोष्ट लैंगिक शोषणाच्या अंतर्गत येत नाही. ‘पॉक्सो’ अंतर्गत या गोष्टींना लैंगिक शोषण म्हणता येणार नाही. बाल लैंगिक अत्याचार सिद्ध होण्यासाठी शरिराचा शरिराला थेट स्पर्श होणे आवश्यक आहे. केवळ शरिराशी चाळे करणे किंवा शरिराला अजाणतेपणी केलेला स्पर्श, हा लैंगिक अत्याचारात मोडत नाही.’ न्यायालयाने आरोपीची शिक्षाही रहित केली होती. नागपूर खंडपिठाच्या या निकालाला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.