पंचतारांकित उपाहारगृहांतील वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून शेतकर्‍यांच्या प्रदूषणावर बोलले जात आहे ! – सर्वोच्च न्यायालय

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – देहलीतील पंचतारांकित, सप्ततारांकित यांसारख्या मोठमोठ्या  उपाहारगृहांतील वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून लोक ‘शेतकरी कसे प्रदूषणात भर घालत आहेत ?’, याविषयी बोलतात. अशांनी कधी त्यांचे भूमीतून मिळणारे उत्पन्न पाहिले आहे का?, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने देहलीच्या प्रदूषणावरील याचिकेवरील सुनावणीच्या वेळी देहली सरकारला सुनावले. ‘आपण या वास्तवाकडेही डोळेझाक करतो की, बंदी असूनही फटाके सर्रासपणे फोडले जात आहेत’, असेही न्यायालयाने या वेळी म्हटले. देहलीच्या शेजारील राज्यांतील शेतकर्‍यांनी तण जाळल्यामुळे देहलीच्या प्रदूषणात वाढ झाल्याचा दावा देहली सरकराकडून केला जात आहे. त्यावर न्यायालयाने वरील शब्दांत सुनावले आहे.

१. न्यायालय म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकर्‍यांना तण न जाळण्याविषयी समजावून सांगायला हवे. आम्हाला शेतकर्‍यांना शिक्षा द्यायची नाही. या शेतकर्‍यांनी किमान आठवडाभर तरी तण जाळू नये, यासाठी त्यांची समजूत काढण्याचे निर्देश आम्ही केंद्राला दिले आहेत.

२. या वेळी न्यायालयाने ‘तुम्ही एक-दोन दिवस सरकारी कार्यालये पूर्णपणे बंद ठेवण्याचा पर्याय का तपासून पहात नाही ? पूर्ण वाहतूक एक-दोन दिवस बंद का ठेवत नाही ?’, असे प्रश्‍न विचारले.

३. या वेळी सरन्यायाधीश एन्.व्ही. रामणा यांनी ‘दूरचित्रवाहिन्यांवर चालणार्‍या चर्चा या इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक प्रदूषणकारी करतात. तेथे प्रत्येक जण स्वतःची धोरणे रेटत असतो; पण येथे आम्ही समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत.