पाकने काश्मीरवरील अवैध नियंत्रण सोडावे ! – भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकला सुनावले

केवळ असे सुनावून पाक काश्मीरवरील नियंत्रण सोडणार नाही, तर त्याच्याशी युद्ध करूनच त्याने गिळंकृत केलेले भूभाग परत मिळवावे लागणार आहेत, हीच वस्तूस्थिती आहे ! – संपादक

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी डॉ. काजल भट

न्यूयार्क (अमेरिका) – जम्मू-काश्मीर आणि लडाख हा प्रदेश नेहमीच भारताचा अविभाज्य भाग होता. यामध्ये पाकिस्तानने अवैधरित्या कह्यात घेतलेल्या भागांचा समावेश आहे. पाकिस्तानने त्यांच्या कह्यातील सर्व क्षेत्रांवरील नियंत्रण त्वरित सोडावे, असे भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकला सुनावले. पाकने येथे काश्मीरचे सूत्र उपस्थित केल्यानंतर भारताने पाकला सुनावले.

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी डॉ. काजल भट या वेळी म्हणाल्या की, पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपिठाचा वापर करून भारताविरुद्ध प्रचार करत आहे. पाकच्या प्रतिनिधींनी जगाचे लक्ष त्यांच्या देशाच्या दुःखद स्थितीवरून वळवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला, जेथे विशेषत: अल्पसंख्यांक समुदायातील लोकांचे जीवन उलथवून टाकले जाते. आम्ही पाकपुरस्कृत आतंकवादाच्या विरोधात कठोर आणि निर्णायक कारवाई करत राहू. पाक आतंकवाद्यांना आश्रय देत असल्याचे, तसेच त्यांना साहाय्य करत असल्याचे सदस्य राष्ट्रांना ठाऊक आहे. आतंकवाद्यांना पाठिंबा, प्रशिक्षण, वित्तपुरवठा आणि शस्त्रे देणे हेच पाकचे धोरण आहे. कोणत्याही अर्थपूर्ण संवादासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, हे पाकचे दायित्व आहे. असा संवाद केवळ आतंकवाद, शत्रुत्व आणि हिंसा यांपासून मुक्त वातावरणातच आयोजित केला जाऊ शकतो.