|
नाशिक – त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेवरून जिल्ह्यातील मालेगाव येथे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. त्याचे लोण नांदेड आणि अमरावती शहरात पसरले. आता या प्रकरणात आक्षेपार्ह ‘व्हिडिओ क्लिप’ सिद्ध करून सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी मालेगाव येथील अनेक भागांत वातावरण प्रक्षुब्ध झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून नगरसेवक अयाज हलचल याला अटक केली आहे.
हलचल याने सिद्ध केलेल्या आक्षेपार्ह ‘व्हिडिओ क्लिप’मध्ये त्रिपुरा येथे मुसलमानांवर अन्याय होत आहे. ‘तेथील दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे’, असे म्हणत ती क्लिप इतर ४ जणांच्या साहाय्याने ‘व्हॉटस्ॲप’च्या विविध गटांवर पाठवण्यात आली होती. ८ नोव्हेंबर या दिवशी हा प्रकार घडला.
पंचनामे पूर्ण, लक्षावधी रुपयांची हानी !
मालेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. महसूल विभागाने हानीग्रस्त भागांची पहाणी केली. त्यात दगडफेकीमध्ये ११ लाख १२ सहस्र रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली आहे. या हिंसाचाराविषयी आतापर्यंत जवळपास ५०० जणांच्या जमावावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे, तर त्यांच्यावर विविध ५ प्रकारचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. ‘सी.सी.टी.व्ही.’चे चित्रण पडताळून संबंधितांना कह्यात घेण्यात येत आहे.