‘पर्यटक टॅक्सीं’ना ‘डिजिटल मीटर’ बसवण्याची प्रक्रिया जलद गतीने राबवा ! – उच्च न्यायालयाची शासनाला सूचना

न्यायालयाला असे सांगावे लागू नये ! – संपादक

पणजी, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यातील ‘पर्यटक टॅक्सीं’ना ‘डिजिटल मीटर’ बसवण्याची प्रक्रिया जलद गतीने राबवण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने गोवा शासनाला केली आहे. गोवा शासनाने ‘डिजिटल मीटर’ बसवणार्‍या संबंधित कंत्राटदाराला ‘डिजिटल मीटर’ बसवण्याची गती वाढवण्यासाठी ‘मीटर’ बसवण्याची केंद्रे आणखी उघडण्यास सांगणार असल्याचे आश्वासन गोवा खंडपिठाला दिले आहे. गोवा खंडपिठात या प्रकरणी पुढील सुनावणी २९ नोव्हेंबर या दिवशी होणार आहे.

गोवा खंडपिठात न्यायालयाचा अवमान झाल्याच्या याचिकेवरून दिलेल्या प्रतिज्ञापत्रात गोवा शासन म्हणते, ‘‘राज्यात १२ नोव्हेंबरपर्यंत एकूण ४ सहस्र १०९ ‘पर्यटक टॅक्सीं’ना डिजिटल मीटर बसवण्यात आले आहेत, तर ‘डिजिटल मीटर’ बसवण्यासाठी आणखी २ सहस्र ६३१ ‘पर्यटक टॅक्सीं’च्या मालकांनी अर्ज केले आहेत.’’