उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्तिकी वारीनिमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा

मानाचे वारकरी म्हणून श्री. कोंडीबा आणि सौ. प्रयागबाई टोणगे यांना शासकीय महापूजेचा मान

कार्तिकी वारीनिमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यानंतर दर्शन घेतांना उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी आणि मानाचे वारकरी

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १५ नोव्हेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट व्हावी, राज्यातील शेतकरी अन् कष्टकरी यांना यश द्यावे. राज्यातील प्रत्येकाच्या घरात धनधान्य, सुख-शांती आणि समृद्धी नांदावी. राज्य, देश आणि जगातील कोरोनाचे संकट कायमचे दूर व्हावे, तसेच सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहाण्याची महाराष्ट्राची परंपरा कायम रहावी, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठल चरणी घातले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री. आणि सौ. पवार यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते. या वेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सौ. सारिका भरणे, मानाचे वारकरी श्री. कोंडीबा टोणगे, सौ. प्रयागबाई टोणगे, आमदार समाधान आवताडे, पंढरपूरच्या नगराध्यक्षा सौ. साधना भोसले यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करतांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,

१. चीन, रशिया आणि युरोप या देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही डोस घेतले असले तरी प्रत्येक नागरिकाने मुखपट्टीचा वापर करायला हवा, तसेच शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे ही एक नागरिक म्हणून आपले नैतिक दायित्व आहे.

२. मंदिर परिसर विकासासाठी केंद्र सरकारकडून साहाय्य मिळण्याविषयी प्रयत्न करण्यात येतील, तसेच पालखी महामार्गाच्या कामात राज्यशासन केंद्र सरकारला सहकार्य करणार आहे.

३. त्रिपुरा येथील घटनेमुळे राज्यातील मालेगाव, नांदेड आणि अमरावती येथे काही घटना घडल्या. अशा प्रकारांमुळे पोलिसांवर ताण येतो. राज्यातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये. जातीय सलोखा राखण्याची आपल्या राज्याची परंपरा असून ही परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे.