शिवचरित्राद्वारे शिवछत्रपतींचा जाज्वल्य इतिहास जिवंत ठेवणारे पद्मविभूषण, शतायुषी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश !

इतिहास जिवंत ठेवणारे पद्मविभूषण, शतायुषी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

पुणे – हिंदवी स्वराज्याची धगधगती ज्वाला सामान्यांच्या मनात प्रज्वलित करण्यासाठी ‘जाळत्या ठिणग्या’ (शिवशाहीरांच्या एका पुस्तकाचे नाव) एकत्र करून जीवनातील ६० वर्षे शिवचरित्राचा अखंड ‘शिवयज्ञ’ करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास सर्वांसमोर जिवंत करणारे तपस्वी, ज्येष्ठ शिवचरित्रकार, ज्येष्ठ इतिहाससंशोधक, पद्मविभूषण, शतायुषी बळवंत मोरोपंत पुरंदरे उपाख्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे १५ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार चालू असतांना निधन झाले. त्यांच्या पश्‍चात् २ मुले आणि १ मुलगी आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांचे अवघे जीवन शिवछत्रपतींच्या कार्याची महती गाण्यासाठी समर्पित केले होते ! आधुनिक काळात अनेक शिवचरित्रकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घराघरांत पोचवले; परंतु शिवरायांना खर्‍या अर्थाने सामान्यांच्या ह्रदयसिंहासनात कायमचे आसनस्थ करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे एकमेव होते. हेच त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य होय ! हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाचा ध्यास घेतलेल्या बाबासाहेबांनी त्यांच्या क्षात्रतेजयुक्त वाणीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात देश-विदेशांत सहस्रो व्याख्याने दिली आणि विपूल लेखन केले. इतिहाससंशोधक असूनही सर्वसमान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिखाण करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वदूर पोचवला, हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते ! त्यांच्या या अमूल्य योगदानासाठी त्यांना वर्ष २०१५ मध्ये ‘महाराष्ट्रभूषण’, तर वर्ष २०१९ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यासह त्यांना असंख्य पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने समस्त राष्ट्र-धर्मप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ‘शिवशाहीरांनी आरंभलेला शिवयज्ञ पुढे अविरतपणे चालू ठेवू’ अशी भावना समस्त शिवप्रेमींमध्ये आहे !

‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाच्या १६ आवृत्त्यांच्या ५ लाखांहून अधिक प्रती प्रकाशित !

बाबासाहेब पुरंदरे यांंनी ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’त सहभागी होऊन अनेक दशके त्यांचे अमूल्य योगदान दिले. पुणे विद्यापिठाच्या ‘मराठा इतिहासाची शकावली – सन १७४० ते १७६४’, या प्रकल्पात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाच्या १६ आवृत्त्यांच्या ५ लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर विपूल वर्णनात्मक लेखन केले; यासह ललित, कादंबरी आणि नाट्य लेखनही केले.

‘जाणता राजा’ हे महानाट्य एकमेवाद्वितीय !

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिग्दर्शित केलेले १५० कलाकारांचा सहभाग असलेले ‘जाणता राजा’ हे महानाट्य हे एकमेवाद्वितीय ठरले. या नाट्याच्या माध्यमातून शिवछत्रपतींचा जाज्ज्वल्य इतिहास प्रत्यक्ष पहाणार्‍यांचे मन शिवमय होत ! या लोकप्रिय नाटकाचे असंख्य प्रयोग झाले. त्याला शिवभक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शतायुषयी शिवशाहीरांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सन्मान !

शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना पुष्पहार घालून सन्मान करतांना समितीचे श्री. कृष्णाजी पाटील !

२९ जुलै २०२१ या दिवशी वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे येथील त्यांच्या रहात्या घरी १६ ऑगस्ट २०२१ या दिवशी त्यांचा सन्मान करण्यात आला होता. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याच्या गौरवार्थ लिहिलेले सन्मानपत्रही या वेळी त्यांना भेट देण्यात आले होते.