दंगल भडकवणार्‍या रझा अकादमीऐवजी स्वरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार्‍या हिंदूंना दोषी ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न ! – आमदार नीतेश राणे, भाजप

मुंबई, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – रझा अकादमीने काढलेला मोर्चा पूर्वनियोजित होता. त्यासाठी ठिकठिकाणी बैठका घेण्यात आल्या होत्या. हे पोलिसांच्या लक्षात का आले नाही ? राज्यात सरकारच्या पाठिंब्याने हिंदूंवर अन्याय चालू आहे का ? हिंदूंनी स्वरक्षणासाठी रस्त्यावर उतरायचे नाही, तर काय घरात बसून मार खायचा का ? स्वरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार्‍या हिंदूंवर लाठीमार करणार्‍या पोलिसांनी रझा अकादमीचा मोर्चा का रोखला नाही ?  पोलिसांना तसा आदेश नव्हता. दंगल भडकवणार्‍या रजा अकादमीऐवजी स्वरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार्‍या हिंदूंना दोषी ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप भाजपचे आमदार नीतेश यांनी १५ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केला. रझा अकादमीने सामाजिक प्रसारमाध्यमांवर दंगल घडवण्यासाठी पाठवलेले संदेश आणि छायाचित्रे दाखवून रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी या वेळी सरकारकडे केली.

आमदार नीतेश राणे पुढे म्हणाले, ‘‘लोकशाहीत प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे; मात्र मोर्चा काढून हिंदूंची दुकाने फोडणे, तसेच पोलिसांवर आक्रमण करणे, हा काय प्रकार आहे ? त्रिपुरामध्ये न झालेल्या घटनेविषयी अफवा पसरवार्‍या रझा अकादमीच्या प्रमुखाला प्रथम अटक करण्याचे धारिष्ट्य पोलिसांनी का दाखवले नाही ? त्रिपुरामध्ये मशिदी जाळण्यात येत असल्याचे एक तरी छायाचित्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दाखवावे. आझाद मैदानावर दंगल घडवणारी रझा अकादमीच होती. रझा अकादमीनेच तिहेरी तलाक आणि कोरोनावरील डोस यांना विरोध केला होता. अशा लोकशाही न मानणार्‍या रझा अकादमीला महाविकास आघाडी पाठीशी का घालत आहे ? खोटी अफवा पसरवून ही दंगल घडवण्यात आली. याकडे महाविकास आघाडी दुर्लक्ष करत आहे. याऐवजी विश्‍व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अन् भाजप यांच्यावर दंगलीचे खापर खोडण्याचा महाविकास आघाडीचा डाव आहे. राहुल गांधी यांनी ‘ट्विटर’वर भडकावू संदेश पाठवला. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही. यापुढे मात्र हिंदूंवरील आक्रमण सहन करणार नाही.’’

नांदेड येथे दंगल चालू असतांना काँग्रेसचे नेते मुंबईतील रझा अकादमीच्या कार्यालयात होते !

नांदेड येथे दंगल चालू असतांना मुंबईमध्ये काँग्रेसचे मुंबई शहराध्यक्ष भाई जगताप, आमदार अमिन पटेल आदी काँग्रेसचे नेते रझा अकादमीच्या कार्यालयात होते. ही छायाचित्रे उपलब्ध आहेत. भाजपचे नेते अनिल बोंडे यांना अटक करणार्‍या पोलिसांनी प्रथम रझा अकादमीच्या कार्यालयात गेलेले काँग्रेसचे नेते, तसेच रझा अकादमीच्या व्यासपिठावर जाऊन भडकावू भाषण करणारे शिवसेनेचे नेते अर्जुन खोपकर यांना प्रथम अटक करावी.