जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !

जंजिरा दुर्गावर स्थानिक धर्मांध मुसलमानांकडून ध्वज फडकावण्यास होतो विरोध !  

पत्रकार परिषदेत माहिती देतांना ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’चे पदाधिकारी

पिंपरी (जिल्हा पुणे) – ऐतिहासिक जंजिरा दुर्गावर स्थानिक धर्मांध मुसलमानांनी भगवा ध्वज फडकवण्यास विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने पुढील ३ महिन्यांत सन्मानाने कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवावा; अन्यथा केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या  कार्यालयासमोर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांनी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दुर्गावरील भगव्या ध्वजाचे कायम रक्षण आणि देखभाल करण्याचे सर्व दायित्व प्रतिष्ठान घेण्यास सिद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस प्रतिष्ठानचे राज्य संपर्क प्रमुख गौरव शेवाळे, गणेश राजपूत आदी पदाधिकारी उपस्थित होते. जंजिरा दुर्गावर स्थानिक धर्मांध मुसलमानांकडून ध्वज लावण्यास वर्ष २०१६ मध्ये मोठा विरोध झाला होता आणि अन्य वेळीही होतो, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

गडावर घोषणा देणे, भगवा ध्वज लावण्यास नेहमीच विरोध

महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख श्री. गौरव शेवाळे यांनी ‘सनातन प्रभात’ला याविषयी माहिती देतांना सांगितले की, जंजिरा दुर्गावर मुरूड येथून जाण्यासाठी बोटीद्वारे जावे लागते. बोटचालक आणि गाईड (मार्गदर्शक) हे स्थानिक मुसलमान आहेत. या दुर्गावर घोषणा देणे, भगवा ध्वज फडकवणे यांसाठी शिवप्रेमींना या मुसलमानांचा विरोध होतो. हा दुर्ग प्रत्यक्षात पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. आमची मागणी आहे की, या गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावण्यात यावा. यासाठी आम्ही या ९ जुलैला आंदोलनही केले आहे. सध्या ३ महिने पावसाळ्यामुळे गडावर जाता येत नाही, तोपर्यंत आम्ही जनजागृती करणार आहोत.

‘हा मुसलमानांचा दुर्ग आहे’, असे म्हणत धर्मांधांचा विरोध !

प्रतिष्ठानचे पुणे जिल्हाध्यक्ष कुणाल साठे यांनी सांगितले की, वर्ष २०१६ मध्ये प्रतिष्ठानच्या वतीने ३०० गड-दुर्गांवर एकाच वेळी भगवा ध्वज फडकवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्या वेळी अन्य गड-दुर्गांवर एकाच वेळी भगवा ध्वज फडकवला; मात्र जंजिरा दुर्गावर स्थानिक धर्मांधांनी याला विरोध केला. काही शिवप्रेमींना ‘हा मुसलमानांचा दुर्ग आहे’, असे म्हणत ध्वज फडकवण्यापासून आणि घोषणा देण्यापासून रोखल्याचा वादग्रस्त व्हिडिओही सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता.

त्यानंतर आमच्या संस्थेच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात येत आहे. पुढील ३ महिन्यांत जंजिरा दुर्गावर सरकारने सन्मानाने भगवा ध्वज न लावल्यास संस्थेच्या वतीने सहस्रो दुर्गप्रेमी एकत्र येऊन तेथे भगवा झेंडा फडकवतील. यासाठी ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थे’चे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांकडे पाठपुरावा !

जंजिरा दुर्गावर शासकीय नियमांनुसार भगवा ध्वज फडकवण्याची अनुमती मिळावी, यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे पाठपुरावा चालू आहे. या मागणीसाठी प्रतिष्ठानने मुंबईतील सायन येथील पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शनेही केली होती.

पद्मदुर्ग येथे जेट्टी उभारण्याची मागणी !

जंजिरा दुर्गाप्रमाणेच ऐतिहासिक पद्मदुर्गावर पर्यटन आणि दळणवळण यांना चालना देण्यासाठी सरकारने तातडीने जेट्टी (नौका स्थानक) उभारावी, अशी मागणी मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती डॉ. गोजमगुंडे यांनी दिली.

संपादकीय भूमिका

अशी चेतावणी का द्यावी लागते ? पोलीस झोपले आहेत का ?