संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण भक्तीमय वातावरणात पार पडले !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण खुडूस फाटा येथील रिंगण सोहळ्यात धावणारा अश्व

सोलापूर – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण २१ जुलै या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील खुडूस फाटा येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडले. माऊलींच्या रथाच्या अश्वाने रिंगणामध्ये फेर्‍या पूर्ण करताच ‘ज्ञानोबा-माऊली’च्या जयघोषात अवघा परिसर दुमदुमून गेला. वारकर्‍यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर फेर धरून फुगडी, झिम्मा आणि विविध पारंपरिक खेळांचा आनंद घेतला. खुडूस फाटा येथील रिंगण हे शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार ज्योतीराम वाघ आणि जयवंत सिद यांच्या शेतभूमीवर भरवले जाते. ग्रामपंचायत आणि स्थानिक यांनी भाविकांसाठी उत्तम सोयी-सुविधा केल्या होत्या.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण खुडूस फाटा येथील रिंगण सोहळ्याचे ड्रोनद्वारे घेतलेले छायाचित्र
रिंगण सोहळ्यासाठी उपस्थित वारकरी

दर्शन रांगेत थकलेल्या वयोवृद्ध जोडप्यांना मंदिरे समितीने घडवले थेट दर्शन ! 

२ वयोवृद्ध भाविकांना दर्शनासाठी सोडतांना सोलापूरचे जिल्हाधिकारी एस्. कार्तिकेयन आणि ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर

पंढरपूर – श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपुरात येणारा भाविक हा दर्शन रांगेत उभा असतो. विठ्ठलाची दर्शनरांग सध्या गोपाळपूर रोडवरील पत्रा शेडपर्यंत आहे. यामध्येच पंढरपूरच्या दर्शन रांगेत २ वयोवृद्ध भाविक उभे होते. हे लक्षात येताच सोलापूरचे जिल्हाधिकारी एस्. कार्तिकेयन आणि ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती’चे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी या भक्तांना दर्शन रांगेतून सोबत घेत विठ्ठलाचे थेट दर्शन घडवले.

श्री विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतांना वयोवृद्ध महिला