यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना घोषित !

पुरस्कार प्रदान सोहळा १ ऑगस्ट या दिवशी

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

पुणे, २१ जुलै (वार्ता.) – देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ घोषित करण्यात आला. येत्या १ ऑगस्ट या दिवशी लोकमान्य टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या प्रांगणात दुपारी १२ वाजता सोहळा होणार असल्याची माहिती ‘टिळक स्मारक ट्रस्ट’चे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

वर्ष १९८३ पासून हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पहिल्या वर्षी एस्.एम्. जोशी या पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यानंतर आतापर्यंत विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या पुस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, अटल बिहारी वाजपेयी, उद्योगपती राहुलकुमार बजाज, शास्त्रज्ञ जी. माधवन् नायर, एन्.आर्. नारायणमूर्ती यांसारखे अनेक मान्यवर या पुरस्काराचे मानकरी ठरल्याची माहिती श्री. रोहित टिळक यांनी दिली.