नवी देहली – एकोणिसाव्या शतकात पृथ्वी आणि त्यावरील जीवन यांच्या भविष्याच्या दृष्टीने हवामानातील पालटाच्या धोक्याविषयी मानवाला भरपूर वेळा चेतावणी दिली गेली होती. अशाच प्रकारची एक चेतावणी १८५० व्या दशकात अमेरिकेतील औद्योगिक क्रांतीच्या वेळी युनिस न्यूटन फूट या महिला शास्त्रज्ञाने दिली होती. हवामान पालट आणि विवेकी महिलांना समाजाकडून मिळणारी वागणूक या भविष्यातील घटनांविषयी त्यांनी दिलेल्या संकेताकडे तेव्हा दुर्लक्ष करण्यात आले होते. वर्ष १८५६ मध्ये ‘अमेरिकन असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स’च्या वार्षिक सभेत युनिस फूट यांना त्यांचा शोधनिबंध प्रस्तुत करण्यास अनुमती नाकारण्यात आली होती.
१. ‘हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या उच्च पातळीचा पृथ्वीच्या तापमानावर विपरीत परिणाम होत आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायूमळे पृथ्वीवरील तापमान वाढत आहे’, असे युनिस फूट यांनी त्यांच्या संशोधनातून सिद्ध केले होते; मात्र हवामान विज्ञान क्षेत्राने त्याची योग्य वेळी नोंद घेतली नाही.
२. गेल्या १४० वर्षांत पृथ्वीचे सरासरी तापमान २.२ टक्के ‘फॅर्हेनहाइट’ने वाढले आहे. युनिस फूट यांच्या संशोधनाकडे वेळीच लक्ष दिले असते, तर आजची स्थिती ओढवली नसती, असे मत हवामान विज्ञान क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.