कामगारांचा अभाव !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘गत २ मासापर्यंत राज्यात ठिकठिकाणी अतीवृष्टी झाली. यामध्ये शेतीपिकांची मोठी हानी झाली. यामुळे विशेषकरून विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश येथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते; परंतु ‘दिवस सारखे रहात नसतात’, यानुसार सध्या कापसाला ८ ते ८.५ सहस्र रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे; मात्र कामगारांच्या अभावामुळे कापसाची वेचणी खोळंबली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी बांधवांची आर्थिक कोंडी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विविध अडचणींना तोंड देत शेतकरी पीक उगवत असतो. प्रतिवर्षी हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे, तर कधी सरकारच्या दुर्लक्षित धोरणांमुळे बळीराजा अडचणीत येतो. एकट्या मराठवाड्याचा विचार केला, तर गत ५ वर्षांपूर्वी कापूस लागवडीसाठी १७ लाख हेक्टर क्षेत्र उपयोगात आणले गेले होते; मात्र या वर्षी हेच लागवड क्षेत्र केवळ १२.५ लाख हेक्टर वापरले आहे. या हंगामामध्ये प्रारंभीच समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे पेरणी आणि लागवड यांची कामे वेळेत पूर्ण झाली. शेतकरीही समाधानी होता; परंतु नंतर पावसाने दडी मारल्यामुळे पिके चांगली आली नाहीत. परिणामी अनेक शेतकरी बांधवांना दुबार (पुन्हा) पेरणी करावी लागली. नंतर मात्र समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पीक चांगले आले. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात अतीवृष्टी झाली आणि हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. असे असले, तरी सध्या कापसाला ८ ते ८.५ सहस्र रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना काही प्रमाणात का होईना, दिलासा मिळत आहे. बाजारात कापसाला भाव आहे; मात्र कापूस वेचणार्‍या कामगारांचा अभाव असल्यामुळे कापूस शेतात पडून आहे. कापूस शेतात पडून असल्याने शेतकर्‍यांनी दिवाळी साजरी केली नाही. सध्या १ मण म्हणजे २० किलो कापूस वेचल्यावर १७० रुपये ते २०० रुपये मजुरी द्यावी लागते. तरीही कामगार मिळत नाहीत. ‘कापूस वेचणी होणार कशी ?’, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे. एकीकडे काम नाही, आणि दुसरीकडे कामगारांच्या अभावी पिके तशीच आहेत, हे चिंताजनक आहे.

शेतामध्ये कष्ट करण्याची मानसिकता अल्प होत आहे. शहरामध्ये जाऊन अल्प कष्ट घेऊन अधिक पैसे मिळवण्याची युवकांची मानसिकता वाढत चालली आहे. ‘एक वेळ शहरात काम मिळाले नाही, तरी चालेल; पण शेतात काम करणार नाही’, असे चित्र निर्माण होत आहे. भारतासारख्या शेतीप्रधान देशात उत्तम शेती न होण्यातील कामगारांचा अभाव ही एक गंभीर समस्या झाली आहे. सरकारने याकडेही लक्ष द्यावे, ही अपेक्षा !’

– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा.