देहली सेवाकेंद्रात सेवेसाठी गेलेल्या श्री. शशांक सिंह यांना तेथील साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. शशांक सिंह

१. वाराणसी येथून देहली सेवाकेंद्रात गेल्यावर तेथे वेगळेपण न जाणवणे

‘देहली सेवाकेंद्रात गेल्यावर ‘मी वाराणसी येथून दुसरीकडे कुठेतरी आलो आहे’, असे मला वाटत नव्हते. मला तिथे कोणताच वेगळेपणा जाणवला नाही. ‘देहली सेवाकेंद्र भविष्यात ‘उत्तर भारतातील रामनाथी आश्रम’च होईल’, असा विचार माझ्या मनात आला.

२. प्रेमभाव असलेल्या आणि इतरांना समजून घेणार्‍या साधिका

एकदा भोजनाच्या अर्धा घंट्यापूर्वी स्वयंपाकघरात दोन साधिका सौ. चौधरीकाकू (सौ. सुनंदा चौधरी, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आणि सौ. येळेगावकरकाकू (सौ. केतकी येळेगावकर, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) ३० जणांचा स्वयंपाक करत होत्या. त्या वेळी एक साधिका त्यांना बाहेरून आलेल्या साधकांसाठी चहा बनवण्यासाठी सांगण्यास आली. तेव्हा त्या दोघी घाईत असूनही त्यांनी ते नम्रतेने स्वीकारले. नंतर त्या साधिकेला त्यांची चाललेली घाई-गडबड लक्षात आली आणि ती स्वतःच चहा करू लागली.

३. व्यासपिठाच्या सिद्धतेची सेवा करतांना इतरांनी सुचवलेल्या सूत्रांचा अभ्यास करून सेवा परिपूर्ण करणारे श्री. कार्तिक साळुंके !

व्यासपिठाच्या सिद्धतेची सेवा करणार्‍या कार्तिकदादांना एखादे सूत्र सुचवल्यावर त्यांनी ‘ते सूत्र कुणाकडून आले आहे किंवा ते सूत्र सांगणारे कोण आहे ?’, असा विचार केला नाही. ती सूत्रे ‘गुरुदेवच सांगत आहेत’, असा त्यांचा भाव असायचा. त्यांनी सर्व सूत्रांचा अभ्यास केला आणि ‘जे सूत्र समजले नाही’, ते अनुभवी साधक किंवा संत यांना विचारून त्याचा निर्णय घेतला. यातून त्यांची स्वीकारण्याची वृत्ती लक्षात आली.

४. इतरांनी सांगितलेली सूत्रे संयमाने ऐकून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारे आणि सेवाभावी वृत्ती असलेले श्री. श्रीराम लुकतुके !

श्रीरामदादांकडे प्रकाशयोजना, ध्वनीयोजना, अधिवेशनाची छायाचित्रे काढणे, ध्वनीचित्रीकरण करणे आणि समितीच्या काही मुख्य सेवा होत्या. त्यांना त्याविषयी इतरांनी सुचवल्यावर ते विचलित होत नव्हते. त्यांना सांगितलेले सूत्र ते संयमाने ऐकून त्याची नोंद करून ठेवत आणि वेळ मिळाल्यावर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत. रात्री उशिरापर्यंत सेवा केल्यानंतरही श्रीरामदादा दुसर्‍या दिवशी सकाळी सर्वांच्या समवेत उठून वेळेत सेवेसाठी येत. इतर साधक थकल्यानंतर झोपायला जात; परंतु दादा सेवा पूर्ण केल्याविना जात नसत.

५. सेवेत अडचणी असूनही ती कुशलतेने पार पाडणारे श्री. प्रथमेश वाळके

मी देहली सेवाकेंद्रात आलो. तेव्हा प्रथमेशदादा वस्तूसंग्रहाची सेवा करत होते. ४ दिवसांपूर्वीच त्यांना ही सेवा मिळाली होती. अन्य साधकांच्या सेवांच्या व्यस्ततेमुळे त्यांच्याकडे साहित्याचे हस्तांतरण व्यवस्थित झाले नव्हते. त्यावर मी दादाला विचारले, ‘‘तुम्ही ही सेवा कशी काय स्वीकारली ?’’ दादाने त्याविषयी कोणतीही तक्रार न करता सर्व परिस्थिती स्वीकारली आणि ती सेवा कुशलतेने सांभाळली. यावरून ‘श्रद्धा ठेवून दादांनी ही सेवा सहजतेने केली’, हे माझ्या लक्षात आले.

६. साधकांचा पाठपुरावा करतांना त्यांच्या अडचणींचा विचार करणारे श्री. प्रदीप वाडकर

दादा प्रत्येक साधकाचा पाठपुरावा घेतात आणि त्यांना येणार्‍या अडचणींविषयी वेळोवेळी विचारतात. साधकाला यायला उशीर झाला, तर त्यांना भ्रमणभाष करून त्याविषयी विचारतात. यावरून ‘पाठपुरावा घेण्याची सेवा कशा प्रकारे करायला पाहिजे’, हे मला शिकायला मिळाले.

७. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी दिलेल्या ध्येयानुसार सर्व साधकांनी प्रयत्न करणे

अधिवेशनाच्या आधी सद्गुरु पिंगळेकाका यांनी सर्व साधकांना ‘साधकांविषयी प्रेम, ईश्वराप्रती भाव आणि परिपूर्ण सेवा’, असे ध्येय व्यष्टी अन् समष्टी साधनेच्या दृष्टीने दिले होते. साधकांनी सेवा करतांना ‘या त्रिसूत्रींवर लक्ष ठेवून अधिवेशनाचा पूर्ण लाभ करून घ्यावा’, असे सांगितले होते. गुरुकृपेने या सर्व गुणांचे साधकांमध्ये दर्शन घडले, याविषयी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. शशांक सिंह, वाराणसी (३०.११.२०१९)