मुख्य ‘दिंडी’ उत्सव १७ नोव्हेंबर या दिवशी
मडगाव, ९ नोव्हेंबर (वार्ता.) कोरोना महामारीसंबंधी सर्व निर्बंधांचे पालन करून मडगाव येथील ‘दिंडी’ उत्सव यंदाही साधेपणानेच साजरा करण्याचा निर्णय श्री हरिमंदिर देवस्थान समितीने घेतला आहे. या वर्षी ‘दिंडी’ उत्सवाला गुरुवार, ११ नोव्हेंबर या दिवशी प्रारंभ होणार आहे आणि तिचा गुरुवार, १८ नोव्हेंबर या दिवशी समारोप होणार आहे. दिंडी उत्सवाचा मुख्य दिवस बुधवार, १७ नोव्हेंबर या दिवशी आहे.
दिंडी उत्सवाच्या निमित्ताने प्रतिदिन मंदिरात धार्मिक कार्यक्रमासमवेतच प्रवचन, कीर्तन, भजन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १३ नोव्हेंबर या काळात सायंकाळी ७ वाजता प्रतिदिन सुप्रसिद्ध प्रवचनकार प्रा. रमेश सप्रे यांची ‘ज्ञानेश्वरी सार’ या विषयावर प्रवचने, १४ ते १६ नोव्हेंबर या काळात वाळपई, सत्तरी येथील ह.भ.प. विवेकबुवा जोशी यांचे कीर्तन आणि उत्सवाच्या समारोपप्रसंगी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सायंकाळी दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा मडगाव पंचक्रोशीत होणारा पालखी मिरवणूक सोहळा रहित करण्यात आला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि इतर देवता यांच्या दर्शनासाठी मंदिर भक्तांना खुले असणार आहे. कोरोना महामारीचा धोका ओळखून भक्तांनी सहकार्य करावे आणि मंदिरात प्रवेश करतांना कोरोना महामारीसंबंधीच्या निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे. याविषयी अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक ९८२२१ ३१३७१ यावर संपर्क साधावा, असे देवस्थान समितीने म्हटले आहे.