आमदार खंवटे फेब्रुवारीत घेणार निर्णय
पणजी, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांच्या समर्थकांनी ९ नोव्हेंबर या दिवशी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ‘मी सध्या अपक्ष आमदार आहे आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर मी पुढील निर्णय घेणार आहे. हा निर्णय गोव्याच्या हिताचा असेल. भाजपचा पाडाव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एका व्यासपिठावर यावे असे मला वाटते’, असे मत आमदार रोहन खंवटे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
आमदार रोहन खंवटे यांचे खंदे समर्थक तथा पेन्ह द फ्रान्स जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य गुपेश नाईक, सुकूरचे पंचसदस्य सुभाष हळर्णकर आदींनी पणजी येथील काँग्रेस कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी अनेकांनी त्यांचे विचार व्यक्त केले. ‘भाजपला लोक कंटाळले आहेत आणि लोक भाजपला येत्या निवडणुकीत धडा शिकवणार आहेत. वाढती महागाई, गैरकारभार आदींच्या विरोधात लोक एकत्र येत आहेत. आता काँग्रेसशिवाय पर्याय नाही’, असा सूर अनेकांनी आळवला.
मये येथील प्रेमेंद्र शेट आज ‘मगोप’मध्ये प्रवेश करणार
डिचोली मये मतदारसंघातील युवा नेते तथा माजी सभापती स्व. अनंत शेट यांचे बंधू प्रेमेंद्र शेट हे १० नोव्हेंबर या दिवशी ‘मगोप’मध्ये प्रवेश करणार आहेत. या निमित्ताने १० नोव्हेंबर या दिवशी मये येथील श्री सातेरी मंदिरात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.