३१ ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तींना सर्वाधिक बाधा !
मुंबई, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरपर्यंत एकूण ६६ लाख १७ सहस्र ६५४ जणांना कोरोनाची लागण झाली. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ५ नोव्हेंबर या दिवशी घोषित केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांना कोरोनाची बाधा अधिक झाली आहे. या आकडेवारीनुसार ५९ टक्के महिलांना, तर ४१ टक्के पुरुषांना कोरोनाची लागण झाली. ७ नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार, ६४ लाख ५९ सहस्र १०८ रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात कोरोनाची सर्वाधिक लागण ३१ ते ४० वयोगटातील व्यक्तींना झाली आहे. हे प्रमाण १४ लाख ७५ सहस्र ६६६ इतके, म्हणजेच राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत २२.२३ टक्के इतके आहे.
या खालोखाल ४१ ते ५० वयोगटातील ११ लाख ८५ सहस्र ३१० व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या तुलनेत १७.८५ टक्के इतके आहे. १०१ ते ११० वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण ०.०४ टक्के म्हणजे सर्वांत न्यून आहे. राज्यात एकूण करण्यात आलेल्या ६ कोटी २८ लाख ७५ सहस्र २९९ कोरोनाच्या चाचण्यांपैकी १२ टक्के व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळले. उर्वरित ८८ टक्के व्यक्तींना कोरोना नव्हता. ७ नोव्हेंबरच्या शासनाच्या आकडेवारीनुसार राज्यात १ लाख ४० सहस्र ३८८ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून अद्यापही राज्यात १४ सहस्र ५२६ कोरोनाचे रुग्ण आहेत.