पंढरपूर येथे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या चौपदरीकरणाच्या कामाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी !
मुंबई – आदि शंकराचार्यांनी पंढरपूरच्या महायोगभूमीत साक्षात् भगवान विठ्ठल आनंद स्वरूपात असल्याचे म्हटले आहे. अशा भूमीत जाणार्या मार्गांची पायाभरणी करण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद होत आहे. रस्ते हे विकासाचे द्वार असतात. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मागर्गांमुळे वारकर्यांना अधिक सुविधा तर मिळणारच आहेत, यासह हे मार्ग पंढरपूरच्या पवित्र मार्गाचे महाद्वार ठरतील, तसेच भागवत धर्माची पताका उंचावणारे महामार्ग ठरतील, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. ८ नोव्हेंबर या दिवशी पंढरपूर येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग या मार्गांची पायाभरणी, तसेच अन्य कामांचा लोकार्पण सोहळा पंतप्राधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या वेळी त्यांनी उपस्थितांना ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन केले.
या वेळी व्यासपिठावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आदी मान्यवर ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला वारकर्यांसह अन्य भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Addressing a programme on infra modernisation in Pandharpur. https://t.co/TxqyNOzR1Y
— Narendra Modi (@narendramodi) November 8, 2021
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पंतप्रधान मोदी म्हणाले,
१. भूतकाळात भारतावर कितीतरी आक्रमणे झाली, नैसर्गिक संकटे आली; मात्र पंढरपूरची वारी चालूच आहे. येथील आषाढी एकादशीचे विहंगम दृश्य कुणीही विसरू शकणार नाही. पंढरीच्या वारीतील २१ दिवसांमध्ये येथे अनोखे शिस्त पहायला मिळते.
२. पंढरीची वारी ही भारताच्या शाश्वत शिक्षणाचे प्रतीक आहे. मार्ग आणि विचार वेगळे असले, तरी आपले लक्ष्य एकच आहे. सर्व पंथ भागवत पंथच आहेत. वारीमध्ये सहभागी झालेले कोणताही भेदभाव अमंगल समजतात. दिंडीत सहभागी होणारे वारकरी एकमेकांना गुरुबंधू समजतात. ‘विठ्ठल’ हेच सर्वांचे गोत्र आहे. सर्व विठ्ठलाची लेकरे आहेत. विठ्ठलाचे द्वार सर्वांसाठी उघडे आहे. हीच भावना आम्हाला विकासासाठी प्रवृत्त करते.
३. माझा पंढरपूरशी विशेष संबंध आहे. श्रीकृष्ण द्वारकेतून येऊन पंढरपूर येथे विठ्ठलाच्या रूपात स्थिर झाले. ती द्वारका असलेल्या गुजरातमधील मी आहे. पंढरपूरची सेवा ही साक्षात् नारायणाची सेवा आहे.
४. महाराष्ट्राच्या भूमीने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ असे किती तरी संत दिले. या भूमीने भारताला ऊर्जा आणि चैतन्य दिले. भारताच्या वेगवेगळ्या भूमींत अशा महान विभूती निर्माण झाल्या. त्यांनी देशाला दिशा दिली. या संतांच्या विचाराने देशाला समृद्ध केले. भक्तीच्या शक्तीची जाणीव करून दिली.
५. वारीमध्ये पुरुषांसमवेत महिलाही बरोबरीने चालतात, हे वारीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हे समानतेचे प्रतीक आहे. येथे वारकरी केवळ स्वत:साठी मागणे मागण्यासाठी नव्हे, तर निरपेक्ष भक्तीने आणि निष्काम सेवेने येतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्राकडे ३ मागण्या !
१. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या दोन्ही बाजूंना सावली देणारे वृक्ष लावण्यात यावेत. हे वृक्ष आतापासूनच लावले, तर रस्ता होईपर्यंत ते मोठे होऊन वारीसाठी येणार्या वारकर्यांना सावली देतील.
२. या मार्गांवर ठराविक अंतरावर शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी. वारकरी २१ दिवस देहभान विसरून वारीत सहभागी होतात. त्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळायला हवे.
३. भविष्यात पंढरपूर हे ‘सर्वांत स्वच्छ तीर्थस्थळ’ म्हणून पहायला मिळावे. हे कार्य लोकसहभागाने पूर्ण होऊ शकेल.
कसे असतील मार्ग ?
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग ५ टप्प्यांत, तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग ३ टप्प्यांत पूर्ण होईल. हे दोन्ही मार्ग ३५० किलोमीटर लांबीचे असतील. त्यासाठी ११ सहस्र कोटी रुपयांहून अधिक व्यय येईल. या समवेत करण्यात येणार्या अन्य काही राष्ट्रीय मार्गांमुळे सातारा, कोल्हापूर, सांगली, विजापूर, मराठवाडा आणि उत्तर भारत येथून भाविकांना पंढरपूर येथे येणे सोपे होईल.
विशेष
१. पंतप्रधानांनी काही भाषण मराठीतून केले. यामध्ये त्यांनी काही अभंगांचाही उल्लेख केला.
२. भाषणाच्या शेवटी त्यांनी सर्व वारकरी आणि इतर संत यांना अभिवादन केले.
येत्या काळात वर्षभर कधीही चारधाम, गंगोत्री, बद्रीनाथ येथे जाता येईल ! – नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री
आपल्या देशात कोट्यवधी भाविक तीर्थयात्रांना जातात. ही तीर्थक्षेत्रे आपला सांस्कृतिक ठेवा आहेत. या तीर्थक्षेत्री जाणारे रस्ते चांगले असायला हवेत. तेथे स्वच्छता असायला हवी. येथील प्रसाधनगृहे स्वच्छ असली पाहिजेत, असा मोदीजी यांचा आग्रह होता. त्यामुळे आम्ही ‘भारतमाला परियोजना’ चालू केली. या परियोजनेत देशभरातील ५० धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. येथील रस्त्याच्या कामांसाठी १२ सहस्र ७० कोटी रुपये व्यय करण्यात आला असून ६७३ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ८२७ किलोमीटरचे काम सर्वाेच्च न्यायालयाच्या अनुमतीने पूर्ण केले जाईल. त्यामुळे येत्या काळात भाविक वर्षभर कधीही चारधाम, गंगोत्री, बद्रीनाथ येथे जाऊ शकतील. मानसरोवरचा मार्ग पूर्ण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रात तुळजापूर, शेगाव, कोल्हापूर, माहूर, शिर्डी येथील मार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे.